पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेल्या भाषणावरून नवा वाद उभा राहिला आहे. शरजील उस्मानी याने प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.

एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्वरित अटक करावी, अशा मागणीचे निवेदन महापौर मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि फिर्यादी प्रदीप गावडे यांनी दिले आहे. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी स्वारगेट पोलिस स्टेशन येथे अगोदरच एक गुन्हा दाखल करण्यात आलेला.

आणखी वाचा- शरजील उस्मानी एल्गार परिषदेत काय म्हणाला? वाचा संपूर्ण भाषण…

प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज (३ फेब्रुवारी) महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि फिर्यादी प्रदीप गावडे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिले. समाजात तेढ निर्माण करणारे शरजील उस्मानी यांचे विधान आहेत. त्या व्यक्ती विरोधात देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी. त्याच बरोबर एल्गार परिषदेच्या आयोजकांची चौकशी करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले पाहिजे. यापुढील काळात अशा प्रकाराची परिषद होता कामा नये, अशी मागणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिलेल्या निवेदनात भाजपानं केली आहे.

यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही भाष्य केलं आहे. शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथकं स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आणखी वाचा- एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपा युवा मोर्चाचे पुणे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वारगेट पोलिसांकडे केली केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.