पुण्याच्या एफटीआयआय अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियामधून एक विद्यार्थी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याचे नाव मनोज कुमार असे आहे. त्याला महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं होतं. ज्यानंतर तो बेपत्ता झाला आहे अशी माहिती संचालक बी. कैनथोला यांनी दिली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसात तक्रार देण्यात आल्याचीह माहिती त्यांनी दिली. पोलीस याप्रकरणी विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत. हा विद्यार्थी लवकरच महाविद्यालयात परतेल अशी आशाही संचालकांनी व्यक्त केली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज कुमार वर्मा हा विद्यार्थी १३ जानेवारीच्या रविवारपासून बेपत्ता आहे. त्याच्या वर्गमित्रांनी याप्रकरणी पहिली तक्रार १७ जानेवारीला नोंदवली असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्याला महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं होतं म्हणून तो अस्वस्थ होता असं त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं. FTII मधील सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डनुसार १३ जानेवारीला रात्री १०.३० वाजता तो महाविद्यालय परिसरात दिसला मात्र त्यानंतर तो दिसलेलाच नाही असेही पोलिसांनी सांगितले आहे. हा विद्यार्थी मूळचा वाराणसीचा आहे. त्याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते अशीही माहिती समजते आहे.

मनोज कुमार वर्मा याचे निलंबन करण्यात आल्याने तो अस्वस्थ होता. त्याने प्राध्यापकांची माफीही मागितली मात्र त्याचे कोणतेच म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. मनोजच्या पत्नीने त्याच्या काही वर्गमित्रांना फोन केला आणि मनोजशी काही संपर्क झाला नसल्याचे सांगितले. त्यानंतर मनोजच्या वर्गमित्रांनीही त्याला फोन केला मात्र त्याचा फोन स्विच ऑफ येतो आहे. आता FTII तर्फेही तक्रार देण्यात आली आहे. तो लवकरच परतेल अशी अपेक्षा संचालकांनी व्यक्त केली आहे.