मराठी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे बुधवारी (१ जून) ‘प्रभात दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षी ३० एप्रिलला मुंबई येथे दादासाहेब फाळके जयंती आणि कोल्हापूर येथे ३ जून रोजी बाबूराव पेंटर जयंती साजरी केली जाते. मराठी चित्रसृष्टीच्या दिग्गज पूर्वसुरींचे स्मरण आणि त्यांना अभिवादन करण्याच्या या परंपरेत यंदापासून प्रभात दिन साजरा करण्याचा निर्णय चित्रपट महामंडळाने घेतला असल्याची माहिती चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी शनिवारी दिली. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता प्रभात फिल्म कंपनीच्या संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहामध्ये ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘रिंगण’ चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे, कार्यकारी निर्माता संजय दावरा यांच्यासह कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. माधवी वैद्य दिग्दर्शित ‘इट्स प्रभात’ माहितीपटाने प्रभात दिन कार्यक्रमाची सांगता होईल.