चित्रपटातून रंजनाबरोबरच नकळतपणे प्रबोधनही झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी रविवारी व्यक्त केले. सगळ्यांनाच भेळपुरी नको असते. अनेकांना पौष्टिक आणि रुचकर भोजन हवे असते, असा दाखलाही त्यांनी या वेळी दिला.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘अस्तू’ हा चित्रपट दाखविण्यात आला. यामध्ये स्मृतिभ्रंश झालेल्या वृद्ध संस्कृत प्राध्यापकाची भूमिका आगाशे यांनी साकारली आहे. यानिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. निर्मात्या शीला राव या प्रसंगी उपस्थित होत्या.
शब्दापलीकडे जाऊन सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे झाला आहे. हा चित्रपट म्हणजे काही दबंग नाही. पण, उत्तम आशय आणि विषय मांडणारा हा चित्रपट रसिकांनी पाहिला पाहिजे, अशी अपेक्षा आगाशे यांनी व्यक्त केली. आपल्याकडे चित्रपट पाहण्याची साक्षरता वाढायला हवी, असेही मत व्यक्त केले.
सुमित्रा भावे म्हणाल्या, मला जे सांगायचे असते ते मी चित्रपट माध्यमातूनच सांगते. हृदयाशी संवाद साधणारा विषय अस्तू चित्रपटातून मांडला आहे. गोष्ट आणि चित्रपट मला डोळ्यासमोर घडताना दिसतो. ही प्रक्रिया आनंददायी आणि आश्चर्यकारक असते.
देशद्रोही ठरविल्यामुळे देश सोडण्याची वेळ
रशियाचे विघटन होत असताना देशातील घडामोडी, राजकीय आणि सामाजिक बदल चित्रपटातून मांडले. त्याबद्दल देशद्रोही ठरविल्याने माझ्यावर देश सोडून फ्रान्समध्ये जाण्याची वेळ आली, असे सर्बिया येथील दिग्दर्शक गोरान पास्कलजेवी यांनी सांगितले. चित्रपट क्षेत्रात काम करण्याचे ठरविल्यानंतर यातून पोट भरण्याइतके तरी पैसे मिळतील का हा प्रश्न होताच. पण, लोकांच्या जगण्याशी संबंधित विषय मी लघुपटातून मांडले. समाजातील ताणतणाव, व्यथा-वेदना हेच माझ्या आस्थेचे विषय राहिले, असे गोरान यांनी सांगितले. एखादी कल्पना सुचली की कलाकारांना पुरेशी मोकळीक देत त्यातून प्रसंगांची मांडणी करण्याची माझी पद्धती आहे, असे सांगणारे गोरान सध्या भारतामध्ये चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावत आहेत. या वास्तव्यातून चित्रपटासाठी मला एक नवा विषय खुणावत असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film pictures mohan agashe piff awakening
First published on: 13-01-2014 at 03:20 IST