News Flash

सामान्यांना आनंद देण्यासाठीच चित्रपटसृष्टीत काम

घरामध्ये पैलवानकी होती. मी तोच वारसा चालवावा अशी वडिलांची इच्छा होती.

 

पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे प्रतिपादन

अभिजात संगीताच्या मैफिलीमध्ये वादन करून बासरी या भगवान श्रीकृष्णाच्या वाद्याची सेवा करू शकलो याचा आनंद आहे. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये हजारो रसिक आनंद घेतात. पण, त्यापलीकडे चित्रपटगीते ऐकणारे करोडो रसिक आहेत. अशा सामान्य रसिकांना आनंद देण्यासाठीच चित्रपटसृष्टीमध्ये काम केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी बुधवारी केले. चित्रपट संगीतामध्ये वादन करण्याचा आनंद लुटला आणि या क्षेत्रात काम करून खूप काही शिकायला मिळाले, असेही त्यांनी सांगितले.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत ‘अंतरंग’ उपक्रमात ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्याशी पं. अमरेंद्र धनेश्वर यांनी संवाद साधला. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पं. चौरासिया यांचा सत्कार केला. त्यापूर्वी ‘षड्ज’ उपक्रमांतर्गत व्ही. पाकिरासामी दिग्दर्शित ‘पं. रामनारायण-ए ट्रिस्ट विथ सारंगी’ आणि एन. शास्त्री दिग्दर्शित ‘उस्ताद अमीर खाँ’ हे लघुपट दाखविण्यात आले.

घरामध्ये पैलवानकी होती. मी तोच वारसा चालवावा अशी वडिलांची इच्छा होती. मात्र, मी बासरीवादनामध्ये रमलो होतो. कटक रेडिओला नोकरी लागली तेव्हा ‘बासरी वाजवणाऱ्याला नोकरी कशी मिळू शकते’ असे वडिलांनी विचारले. अन्नपूर्णा देवी यांच्याकडे गेलो होतो. ‘मी बासरी वाजवत नाही. त्यामुळे तू येथून जा’ असे म्हणून त्यांनी मला शिकविण्यासाठी प्रारंभी नकार दिला होता. ‘मला सूरबहार शिकायचे नाही. पण, घराण्याची शैली समजून घेत ते सूर बासरीतून वाजविण्याचा प्रयत्न करेन’, असे सांगितले तेव्हा त्यांनी मला शिकविले.

हिंदुस्थानी संगीत जगभरात नावाजलेले आहे. हॉलंडमध्ये मी २८ वर्षे संगीत शिकवले.  गिटार, ड्रम वाजविणाऱ्या तेथील उत्तम कलाकारांनी बासरी, सतार, सरोद अशी वाद्ये हाती घेतली आहेत. ते धृपद, ख्याल आणि ठुमरी वाजवतात. शाकाहारी झाले आहेत. चप्पल घालत नाहीत. वृंदावन गुरुकुलमध्ये कोणीच शिष्य नाहीत. सारे माझे मित्र आणि परिवाराचे सदस्य असतात. आता गुरुकुलमध्ये मुले नाहीतच. मोठय़ा प्रमाणावर मुली बासरीवादन शिकत आहेत. गोपींनी वादन करू नये असे भगवान श्रीकृष्णाने थोडेच सांगितले आहे.

‘प्रत्येक मंत्र्याच्या घरी बासरीवादन व्हावे’

बासरी संगीतातील पहिले वाद्य आहे. श्रीकृष्णाच्या आधी हे वाद्य वाजले जात असावे. मात्र, श्रीकृष्ण यांनी काय वाजवले याचे ध्वनिमुद्रण उपलब्ध नाही, अशी मिश्कील टिप्पणी पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी केली. पूर्वी शेतीची कामे झाल्यावर लोक बासरी आणि ड्रम वाजवून आनंद व्यक्त करत असत. आता भजन, गज़्‍ल, लोकसंगीत अशा सर्व संगीत प्रकारांत बासरीचे वादन केले जाते. बासरीवादनातून योग करण्याचा व्यायाम होतो आणि शरीरही तंदुरुस्त राहते. प्रत्येक मंत्र्यांच्या घरी बासरीवादन झाले पाहिजे. म्हणजे भांडणं न होता घरात माधुर्य राहील, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 12:47 am

Web Title: film work only to please the common people akp 94
Next Stories
1 शिरूर मतदारसंघातील प्रश्नांसाठी आढळरावांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
2 कर्तृत्ववान नेता
3 भूमिपुत्रांचा तारणहार
Just Now!
X