News Flash

पुणे – बैलाची दशक्रिया विधी करत बैलगाडा मालकाने बांधली समाधी

भावपूर्ण निरोप देताना गराडे कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते

खरं तर पुणे जिल्ह्याच्या मावळ परिसरात बैलगाडा शर्यत ही जीव की प्राण आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद आहे. अशा परिस्थितीतही बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. मावळमधील धामणे गावातील ज्ञानेश्वर उर्फ माऊली वाघोजी गराडे यांनीदेखील आपल्या कबीऱ्याचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. नुकतंच ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झालं. आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. बैलाला शेवटचा निरोप देताना त्यांनी रितसर दशक्रिया विधी केला. इतकंच नाही तर त्याची समाधी उभारून मुंडन करत विधीवत पूजा केली.

ज्ञानेश्वर उर्फ माऊली वाघोजी गराडे यांनी चाकणच्या बाजारातून कबीऱ्याला (बैल) विकत घेतलं होतं. त्यावेळी तो फक्त सहा महिन्यांचा होता. त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं. अगदी घरातील लहान मुलाला सांभाळतात तसा त्याचा सांभाळ केला. कबीऱ्याला देखील घरातील व्यक्तींचा लळा लागला होता.

अगदी एखादी बैलगाडा शर्यत असली की, कबीऱ्या हमखास पहिला येणार यात काही शंकाच नव्हती. मालक ज्ञानेश्वर यांना कबीऱ्याने अनेक शर्यती जिंकून दिल्या. कबीऱ्यामुळे ज्ञानेश्वर यांना चार तालुक्यातील सगळे लोक ओळखू लागले होते. मावळ केसरी, मुळशी केसरी, हिंदकेसरी अशा अनेक बैलगाडा शर्यती त्याने जिंकून दिल्या होत्या. त्याला घाटाचा राजा देखील म्हटलं जायचं.

परंतु, गराडे कुटुंबासोबतचा गेल्या १८ वर्षांचा प्रवास १ फेब्रुवारीला संपला. गेल्या सहा वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद असल्याने तो गोठ्यात बसून होता. असं असतानाही मालक ज्ञानेश्वर यांनी त्याला काही कमी पडू दिले नाही. मात्र, शर्यत बंद झाल्याने त्याचा स्थूलपणा वाढला होता. त्यामुळे १ फेब्रुवारीला त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जेव्हा, ज्ञानेश्वर गराडे त्याला पाहण्यासाठी सकाळी गेले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.

यानंतर त्यांनी घरातील एका सदस्याप्रमाणे कबीऱ्याचा दशक्रिया विधी केला. तसंच घराजवळच समाधी उभारली आहे. या दशक्रिया विधीला अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते. यावेळी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित करत लवकरात लवकर शर्यती सुरू कराव्यात अशी भावना व्यक्त करण्यात आली. भावपूर्ण निरोप देताना गराडे कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते. शेतकरी आणि बैल यांच्यातील असं अनोखं प्रेम माणसांमध्येही आजकाल पहायला मिळत नाही हे मात्र खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 4:48 pm

Web Title: final cremation of bull in pune kjp 91 sgy 87
Next Stories
1 पुण्यात चेहर्‍यावर ॲसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
2 पोहे का केले? पुण्यात नवऱ्याला बायकोनं बदडले
3 Teddy Day: पुणे पोलिस म्हणतायत कुठेही टेडी बेअर दिसला तर आम्हाला कळवा…
Just Now!
X