व्होडाफोन रंगसंगीत २०१३ महोत्सवाची अंतिम फेरी रविवारी (१० नोव्हेंबर) बालगंधर्व रंगमंदिर येथे होत असून पुणे, नाशिक, औरंगाबाद, कणकवली आणि गोवा या पाच केंद्रांमधील १३ संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगणार आहे.
या स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे. गद्य नाटकांची अंतिम फेरी शनिवारी (९ नोव्हेंबर) भरत नाटय़ मंदिर येथे होणार असून श्रीराम पेंडसे, कल्याणी मुळ्ये आणि अश्विनी गिरी हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तर, संगीत नाटकांची अंतिम फेरी रविवारी (१० नोव्हेंबर) बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी आणि राहुल देशपांडे हे परीक्षक असतील. प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये याखेरीज स्वानंद किरकिरे आणि विजय केंकरे उपस्थित राहणार आहेत. विजेत्या संघांना पाच लाख रुपयांच्या बक्षिसासह संगीत नाटकासाठी एक लाख  रुपयांचे तर, गद्य नाटकासाठी दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती थिएटर अॅकॅडमीचे प्रसाद पुरंदरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
सप्टेंबरपासून सुरू असलेल्या नाशिक, औरंगाबाद, पुणे, कणकवली आणि गोवा येथे झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये १२० संघ सहभागी झाले होते. त्यातून सहा गद्य आणि सात संगीत नाटकांचा समावेश आहे. ही अंतिम फेरी रसिकांसाठी खुली असून त्याच्या प्रवेशिका सुरुवातीच्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध होणार आहेत.