करोनाचे संकट गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांवर आहे. या संकटामुळे अनेकांनी आपला रोजगार देखील गमावावा लागला आहे. तर कित्येकांचे व्यवसाय ठप्प पडले असल्याने त्यांच्या समोर जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. अन्य व्यावसायिकांप्रमाणे यात जिम चालकांचा देखील समावेश आहे.
राज्यात मागील साडेचार महिन्यांपासून जिम बंद आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने अद्याप जिम सुरू करण्याबाबतर कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यभरासह पिंपरी-चिंचवडमधील जिम व्यवसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांना लाखांच्या घरात भाडे द्यावे लागत आहे. जिम बंद असल्याने कोणतेही उत्पन्न नसल्याने हे एवढे भाडे भरायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात असणाऱ्या जिम चालक कृष्णा भंडलकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले असुन, राज्यसरकारने जिम चालकांना नवसंजीवनी देऊन जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. भंडलकर हे स्वतः जिम चालक आहेत. त्यांच्या जिममधील ट्रेनर, सफाई कामगार यांचे पगार थकलेले असून वीज बिल देखील साडेचार महिन्यांपासून भरले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिम बंद असल्याने पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. जिमला महिन्याला ८० हजार भाडे आहे. आत्तापर्यंत ट्रेनर आणि सफाई कामगार असे मिळवून एकूण ५ लाख रुपये देणे आहेत.
हीच परिस्थिती महाराष्ट्रसह इतर राज्यातील जिम चालकांची आहे. जिमवर आधारित असलेले छोटे व्यवसाय आणि दुकानदार हे बेरोजगार झाले आहेत. राज्य सरकारने जिम सुरू करण्यास परवानगी देऊन फिट इंडिया या मोहिमेला मदत करावी, जेणेकरून व्यायामामुळे नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपण करोनावर मात करू शकू असे जिम चालक कृष्णा भंडलकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, त्यांना राज्यसरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असून जिम चालकांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, तसेच सोशल डिस्टसिंग पाळू, असे सांगत जिम सुरू करण्यास सरकार परवानगी द्यावी असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 10:47 am