माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील भागीदाराने एकाची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमेरिकेतील भागीदाराविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रजनीश कुमार (वय ४२, रा. बिहार) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अप्रतिम दत्ता (वय ४७, रा. लिंकन पार्क, न्यूयॉर्क, अमेरिका) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीश कुमार यांच्या कंपनीचे हडपसर येथील  अ‍ॅमानोरा पार्क भागात कार्यालय आहे. रजनीश आणि अप्रतिम दोघे भागीदार आहेत. त्यांची अमेरिकेत माहिती-तंत्रज्ञान कंपनी आहे. अप्रतिम या कंपनीचा समभागधारक आहे. दोघांनी २०१५ मध्ये भारतात व्हेरिपिशंट टेक्नोलॉजी इंक कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या नावासारखीच व्हेरिफिशंट टेक्नॉलोजी प्रा. लि. या कंपनीची स्थापना अप्रतिम याने केली. रजनीश यांना याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती. कंपनीचे संकेतस्थळ, बोधचिन्ह, ईमेल तसेच मनुष्यबळाचा वापर अप्रतिमने केला. त्याने माझी तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे रजनीश यांनी फिर्यादीत म्हटले आहे. व्हेरिपिशंट टेक्नोलॉजी इंक कंपनीचे व्यवहार अप्रतिम दत्ता याने व्हेरिफिशंट टेक्नॉलोजी प्रा. लि. मध्ये हस्तांतरित केले आहेत, असे रजनीश यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे तपास करत आहेत.