पालिकेच्या आवारात फलक फेकून राडा केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कामठे हे बनावट कागदपत्राप्रकरणी सध्या जामिनावर आहेत. पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कामठे यांनी फलक फेकले होते. याआधी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी याच प्रवेशद्वारासमोर कचरा फेकून आंदोलन केले होते. तेव्हा मात्र पालिकेने त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना एक आणि विरोधकांना वेगळा न्याय पालिकेकडून दिला जात असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

तुषार कामठे यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर फलक टाकून राडा घातला होता. त्याप्रकारणी नगरसेवक कामठे यांच्यावर पिंपरी पोलिसांत दखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अनाधिकृत फलकांचा सुळसुळाट असून पालिका याकडे कानाडोळा करत असल्याचा कामठे यांनी आरोप केला होता. पुरावा म्हणून दोन टेम्पो भरून आणलेले अनधिकृत फलक पालिका प्रवेशद्वारात त्यांनी फेकले. पिंपरी-चिंचवड येथे एक हाती सत्ता असलेल्या भाजपाला कामठे यांनी या आंदोलनातून घरचा आहेर दिला आहे. आंदोलन करणारे कामठे यांनी निवडणूक आयोगाला बनावट शैक्षणिक कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यांत सांगवी पोलिसांनी अटक केली होती.