केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे असलेल्या कारचे बेकायदा PUC ( प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआयने ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. पोल्युशन अंडर कंट्रोलचे बेकायदा प्रमाण पत्र देणाऱ्या पीयुसी सेंटर विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. डेक्कन पोलीस ठाण्याने ही कारवाई केली. ज्या वाहनाची PUC देण्यात आली ते वाहन दिल्लीत वापरले जाते असाही आरोप करण्यात आला आहे. तसेच PUC देणाऱ्या एजन्सीने वाहनाची तपासणी न करताच पोल्युशन अंडर कंट्रोलचे प्रमाणपत्र देऊन टाकले. हे प्रमाणपत्र देण्यापूर्वी ज्या उपकरणाचा उपयोग केला जातो ते उपकरणही वापरण्यात आले नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच बेकायदा पीयुसी देणाऱ्या एजन्सींचं प्रकरण महाराष्ट्रात समोर आलं होतं. अनेक पीयुसी एजन्सीज वाहनांची चाचणी न करताच त्यांना पीयुसी प्रमाणपत्र देत होत्या. तसेच नितीन गडकरी यांच्या नावे असलेल्या कारला दोन ते तीन एजन्सीजने पीयुसी प्रमाणपत्र दिलं होतं असाही प्रकार समोर आला आहे. पुणे, चंद्रपूर, नागपूर या शहरांमध्ये एकाच नंबरच्या कारला पीयुसी देण्यात आल्याचा प्रकार घडल्याचेही समोर आले आहे. ज्याप्रकरणी पुण्यातल्या डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच नव्या वाहतूक नियमांबाबत आणि दंडाच्या रकमेबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी त्याचे समर्थन केले होते. सध्या जी दंडाची रक्कम आकारली जाते आहे ती योग्यच आहे असे त्यांनी म्हटले होते. तसंच भरधाव वेगात गाडी चालवल्याप्रकरणी मलाही दंड भरावा लागला होता अशीही कबुली नितीन गडकरी यांनी 9 सप्टेंबर रोजी दिली होती.

मोटर वाहन कायद्यात बदल करुन दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. त्याविरोधात विरोधकांनी टीका करत ही रक्कम खूप जास्त असल्याचं म्हटलं होतं. मात्र दंडाची रक्कम जास्त नाही तर योग्यच आहे असं गडकरी यांनी स्पष्ट केलं. तसंच वांद्रे वरळी सी लिंकवर भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळे एकदा मलाही दंड भरावा लागला होता असेही गडकरींनी सांगितले होते. आता त्यांच्या नावे असलेल्या कारला बेकायदा पीयुसी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्याने पीयुसी प्रमाणपत्र देणाऱ्या एजन्सीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.