02 March 2021

News Flash

संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल; राजकीय षडयंत्र असल्याचा केला दावा

चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संजय काकडे, भाजपाचे माजी खासदार

दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याच्या मेव्हण्याच्या तक्रारीवरुन भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, हा गुन्हा राजकीय षडयंत्रातून दाखल झाल्याचा दावा काकडे यांनी केला असून आपल्याला न्याय मिळावा अशी भूमिका त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मांडली. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करणार असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.

भाजपाचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आपल्या मेव्हण्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार काल चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत काकडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

संजय काकडे म्हणाले, “मेव्हणा युवराज ढमाले याने माझ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे समजल्यावर वाईट वाटले आहे. गेल्या तीन वर्षात मी ढमाले याला केवळ दोनदाच भेटलो आहे, ते ही एकदा माझ्या वाढदिवसादिवशीच. मात्र, हे एक राजकीय षडयंत्र आहे. माझ्यासारख्या माजी खासदारावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी किमान पोलिसांनी मला विचारणे गरजेचे होते. मात्र, कोणत्याही प्रकारची कल्पना न देताच पोलिसानी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातून त्यांच्यावर राजकीय दाबाव असल्याचे दिसून येते.”

“त्यामुळे या षडयंत्राविरोधात मी लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असून त्यातून सत्य परिस्थिती समोर येईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मिळवून देण्याची मागणी करणार आहे,” असेही काकडे यावेळी म्हणाले.

संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे – युवराज ढमाले

“माजी खासदार संजय काकडे यांनी मला २०१८ मध्ये जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मी शांत बसलो कारण मला दोन लहान मुले आहेत. मी माझा व्यवसाय करीत राहिलो. मात्र तरी देखील मागील तीन वर्षात माझ्यापर्यंत अनेक गोष्ट येत राहिल्या, खूप अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर अखेर मी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार माझे भाऊजी माजी खासदार संजय काकडे आणि बहीण उषा संजय काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मला जीवे मारण्याची धमकी देण्याचा त्यांचा एकच हेतू दिसून येतो की, मी त्यांच्यापुढे जाऊ नये. तसेच या कौटुंबीक वादामुळे हे सर्व घडले असून, मागील तीन वर्षात बहिणीकडून राखी सुद्धा बांधुन घेतली नाही. आज रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी बद्दल बोलावे लागत आहे. या सारखे दुर्देव काय? तसेच मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या मार्फत किंवा कोणी सांगितले म्हणून तक्रार दिलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर सर्व सत्य परिस्थिती समोर येईल.” संजय काकडे यांचे मेहुणे युवराज ढमाले यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 12:38 pm

Web Title: fir lodged on sanjay kakade for threatening claimed to be a political conspiracy aau 85 svk 88
Next Stories
1 ‘एनआयए’चा हनी बाबूंच्या निवासस्थानी छापा
2 परीक्षांसाठी ‘एमपीएससी’ची लगबग
3 पावसाची नवी तारीख.. ६ ऑगस्ट!
Just Now!
X