पुण्यातील बाणेर परिसरातील IISER या शिक्षणसंस्थेच्या दुसर्‍या मजल्याला आग लागल्याची घटना घडली असून या आगीचं कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील IISER अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या दुसर्‍या मजल्यावरील लॅबच्या एका कोपऱ्यातून धूर येत असल्याचे कर्मचार्‍यांना दिसले. त्या घटनेची माहिती आम्हाला मिळताच, काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलो. मात्र तोवर आगीने दुसर्‍या मजल्यावरील साहित्य संपूर्ण जळून खाक झाले.

आतमधील बाजूस प्रचंड धूर असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अडचणी आल्या. मात्र पुढील काही मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. तसेच ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकले नाही. ही आग पाण्याच्या चार टॅंकर्सच्या मदतीने आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, प्रयोगशाळेत काम करत असलेला एक विद्यार्थी या दुर्घटनेमध्ये किरकोळ जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत आणि आता त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या करोना प्रादुर्भावामुळे या शिक्षणसंस्थेमध्ये मोजकेच विद्यार्थी राहत आहेत. तसंच प्रयोगशाळेत जाऊन शिक्षण घेणाऱ्या अथवा प्रयोग करणाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे.