पुणे-सातारा रस्त्यावर सिटीप्राईड जवळील हॉटेल मैहफिलमध्ये आग लागल्याची घटना घडली. तेथील भटारखान्यामध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्निशमन दलाच्या एका जवानासह हॉटेलमधील चार कर्मचारी जखमी झाले आहेत. किसन गोगावले (५५) आणि हॉटेल मैहफिलचे चार कर्मचारी हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मैहफिलच्या भटारखान्याला आग लागल्याची माहिती रात्री अकरा वाजता मिळाल्यानंतर कात्रज आणि मुख्यालयातून अग्निशमन वाहने घटना स्थळी रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच आगीमुळे चार कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेल्याचे जवानांना समजले.

त्याच दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु असताना दलाचे किसन गोगावले आणि जवान चंद्रकांत गावडे हे आतमध्ये भटारखान्यात लिकेज झालेला सिलेंडर घेऊन बाहेर येत होते. त्याचवेळी लिकेज गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेले किसन गोगावले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत तर या आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे.