विश्रांतवाडीतील शांतीनगर कॉर्नरला असलेल्या गादीच्या दुकानाला आज (सोमवार) सकाळी लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अधिक माहिती अशी, शांती नगर येथील हुस्न गादी सेंटर या दुकानाला आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्या वेळी दुकानात मोहम्मद अकबर हे काम करत होते. दुकानाला अचानक आग लागल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. कापूस असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीत मोहम्मद अकबर यांचा होरपळून मृत्यू झाला. दुकानाच्या बाजूस टायरचे दुकान आहे. त्याचेही थोडेसे नुकसान झाले. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यानी आग विझविली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.