कोणतीही घटना घडली की, आजूबाजूला लोकांचा गराडा पडतोच. पण, काय घडल हे जाणून घेण्यासाठी जमलेली ही गर्दी कधी कधी जीवघेणी ठरते. पुण्यात अशाच गर्दीनं अग्निशामक दलाच्या जवानाचा बळी घेतला. घडलं अस की, अमृत योजनेअंतर्गत खोदण्यात सुरू असलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्यानं एक कामगार अडकला. त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत असताना अग्निशामक दलाच्या जवानांच्या अंगावर पुन्हा मातीचा ढिगारा कोसळला. पण, हा ढिगारा कोसळण्याला जमलेली गर्दी कारणीभूत ठरली.

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे रविवारी रात्री कामगार गटाराच्या खड्ड्यात कामगार अडकल्याची घटना घडली. त्याला बाहेर काढत असताना अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव हे शहिद झाले. नागेश नावाच्या कामगाराला वाचवतानाचा व्हिडिओ ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या हाती लागला असून, यात अग्निशमन कर्मचारी विशाल, निखिल आणि सरोष फुंदेसह इतर दोघे जण नागेशला मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. याचवेळी बघ्यांची गर्दी जास्त होती आणि माती ढासळत असल्याचे एक जण सांगतोय तेवढ्यात व्हिडीओ बंद झाला.

रविवारी सायंकाळी नागेश जमादार हा अमृत योजनेअंतर्गत खोदकाम सुरू असलेल्या तिथे काम करत होता. तो खड्ड्यात उतरून खोदकाम करत असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. तेव्हा त्याच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. शेजारीच असलेल्या इतर दोन तरुणांनी नागेशला वर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागेश निघत नव्हता. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. तातडीने विशाल जाधव, निखिल गोगावले आणि सरोष फुंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीडीच्या मदतीने खाली उतरत नागेशला वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या वेळेत तिथे मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

आणखी वाचा- मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारासह जवानाचा मृत्यू

ज्यावेळी तरुण ईश्वर बडगे, सीताराम सुरवसे, अग्निशमन कर्मचारी विशाल जाधव, निखिल गोगावले आणि सरोष फुंदे हे नागेशला वर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. अगदी त्याला कमरेपर्यंत काढण्यात पाच जणांना यश आले होते. मोबाईलची बॅटरी लावून नागेशच्या गुडघ्यापर्यंत माती काढण्याचे काम झाले. तेवढ्यात गर्दीच्या ओझ्यामुळे माती ढासळत असल्याचे बोलले जातेय हे सर्व व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अग्निशमन जवान विशाल जाधव यांचा मृत्यूला नेमक कुणाला जबाबदार ठरवायचं?  बघ्यांची गर्दी तर जबाबदार नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.