अमृत योजनेअंतर्गत खोदण्यात सुरू असलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्यानं एक कामगार अडकला. त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत असताना अग्निशामक दलाच्या जवानांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. या घटनेत कामगारासह अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. अडकलेल्या इतर दोन कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे रविवारी रात्री ही घटना घडली.

रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बदली कामगार नागेश कल्याणी जमादार हा अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गटारीच्या खडड्यात काम करत होता. तेव्हा त्याच्या अंगावर अचानक मातीचा ढिगारा कोसळला. त्याचा आवाज ऐकून शेजारीच असलेले ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे हे धावत आले. कामगार नागेश हा कमरेइतक्या मातीत अडकला होता. उपस्थित दोन्ही कामगार त्यांना काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पुन्हा मातीचा ढिगारा कोसळला आणि तिघेही अडकले. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले. विशाल जाधव (मयत जवान), सरोष फुंदे, निखिल गोगावले हे घटनास्थळी दाखल झाले. सीडीच्या मदतीनं ते खड्ड्यात उतरले मदतीसाठी गेलेले तरुण ईश्वर आणि सीताराम यांना सुखरूप बाहेर काढले. कामगार नागेशला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न तिन्ही जवान करत असताना अचानक पुन्हा मातीचा ढिगारा नागेश, विशाल, निखिल आणि सरोष यांच्या अंगावर कोसळला. यात विशाल यांचे तोंड मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.

त्यानंतर अग्निशमन दलाचे दुसरे पथक, एनडीआरएफ, लष्कर घटनास्थळी दाखल झाले. कर्मचारी निखिल, सरोष आणि विशाल यांना खडड्याच्या बाहेर काढण्यात आले. मात्र, विशाल जाधव यांचा औंध येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर निखिल आणि सरोष यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्बल नऊ तासाच्या अथक प्रयत्नानंतर कामगार नागेश यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

विशाल जाधव यांच्या पाश्चात्य एक दोन वर्षांची मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, या घटनेत ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.