अग्निशमन दलाने ५७४ जणांना सुरक्षित स्थळी हलवले

पुणे : रात्रभर खणाणणारे अग्निशमन दलाचे दूरध्वनी, नागरिकांची मदतीसाठी याचना आणि सातत्याने वेगवेगळ्या भागातून मिळत असलेली पावसाची माहिती अशा परिस्थितीत अग्निशमन दलाचे मदतकार्य बुधवारी रात्रभर आणि गुरुवारीही दिवसभर सुरू होते.

कात्रजपासून, सिंहगड रस्ता तसेच शहरातील मध्य भाग अशा अनेक भागातून नागरिक अग्निशमन दलाकडे मदत मागत होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुटय़ा रद्द करून त्यांना तातडीने हजर होण्याचे आदेश देण्यात आले आणि अधिकारी व जवान मदतकार्यात उतरले. या मदतकार्यात पोलीस तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे साहाय्य महत्त्वपूर्ण ठरले.

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर अग्निशमन दलाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागातील ५७४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. रात्री दहानंतर मदतीसाठीचे  दूरध्वनी अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षात येऊ लागले. दूरध्वनी येण्याचे प्रमाण मोठे होते. मुसळधार पावसामुळे दूरध्वनी सेवादेखील विस्कळीत झाली. कात्रज, धनकवडी, आंबेगाव, लेकटाऊन सोसायटी, पद्मावती, अरण्येश्वर, सिंहगड रस्ता, किरकिटवाडी, कोल्हेवाडी, वारजे, कोथरूड भागात अग्निशमन दलाचे जवान पहाटेपर्यंत कार्यरत होते. जवानांना स्थानिक कार्यकर्त्यांनी साहाय्य केले. मात्र, काही उत्साही कार्यकर्त्यांमुळे मदतकार्यात अडथळे आले.

हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात रात्री अकराच्या सुमारास एका छोटय़ा पुलावरून पाणी जाऊ लागले आणि त्यामुळे ट्रकमध्ये अडकलेल्या चारजणांची सुटका करण्यात आली. दत्तवाडी भाग, आंबिल ओढा वसाहत, अरण्येश्वर भागातील अण्णाभाऊ साठे वसाहत, शाहू वसाहत भागातील नागरिकांचीही सुटका करण्यात आली. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास घेवारे, शंकर सलगर, कुलदीप संकपाळ, ज्ञानेश्वर वगरे, तानाजी निकम, सुधीर घोटकुले मदतकार्यात सहभागी झाले होते. या भागात पाण्याच्या लोटात वाहून चाललेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी वाचवले.

पूरग्रस्त नागरिकांसाठी शहरवासीयांचा मदतीचा हात

आंबील ओढा फुटून शहराच्या दक्षिण भागावर ओढवलेल्या पूरसंकटात आपले सर्वस्व गमावलेल्या अनेकांना मदतीचा दिलासा देण्यासाठी शहराच्या उर्वरित भागातील मदतीचे हात सरसावले आहेत. पिण्याचे पाणी, बिस्किटांचे पुडे, जेवण, पांघरुणे याच्या बरोबरीने ज्यांचे घर पाण्यात आहे, त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करण्यासाठी देखील व्यक्ती आणि संस्था पुढे आल्या आहेत.

हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन वंदे मातरम् या संघटनेने स. प. महाविद्यालयात नागरिकांच्या राहाण्याची आणि जेवण्याची सोय केली आहे. पाऊस किंवा पूरसदृश परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी जीव धोक्यात न घालता येथे यावे, असे आवाहन देखील वंदे मातरम् तर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीतर्फे दांडेकर पूल, राजेंद्र नगर आणि दत्तवाडी परिसरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी विविध ठिकाणी गुरुवारी दुपारी आणि रात्रीचे जेवण वितरित करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. त्यासाठी सुमारे पाच हजार पोळ्यांचे संकलन आणि वितरण करण्यात आले. पुराचा फटका बसलेल्या विभागांमध्ये वितरित करण्यासाठी पांघरुणे आणि सतरंज्यांचे संकलन करून त्याचे वितरण देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीतर्फे करण्यात आले. बिबवेवाडी परिसरातील सुगरण स्वयंपाक घर येथे पूरग्रस्तांसाठी पोळी-भाजी आणि पाण्याची बाटली अशी मदत उपलब्ध करून देण्यात आली.

बिबवेवाडीत सर्वाधिक पावसाची नोंद

पुणे शहर आणि परिसरामध्ये बुधवारी झालेल्या पावसाने पुण्याच्या दक्षिण भागात हाहाकार उडवून दिला. याच परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. बिबवेवाडी भागात विक्रमी १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुण्याच्या इतिहासामध्ये मागील अनेक वर्षांत कोणत्याही एका विभागात इतक्या मोठय़ा पावसाची नोंद झालेली नाही.

बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीनंतरही सुरू होता. पुण्याचा दक्षिण भाग आणि सिंहगड रस्ता परिसरात हजारो घरांमध्ये आणि सोसायटय़ांत पाणी शिरले. पाण्याच्या लोंढय़ात नागरिक वाहून गेले. त्याचप्रमाणे मोटारी आणि दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये शिवाजीनगर केंद्रामध्ये ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाषाण येथे ७४ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. बिबवेवाडी येथे १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यामध्ये २४ तासांमध्ये आजपर्यंत १३२ मिलिमीटर पावसाची नोंद होती. पुणे जिल्ह्यमध्ये सर्वाधिक पाऊस सासवड येथे १३९ मिलिमीटर नोंदविला गेला.

गुरुवारी शहरात पावसाचा हलका शिडकावा झाला. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस ढगांच्या कडकडाटात हलका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.