जुन्या मुंबई पुणे महामार्गावर निगडी ते देहूरोड दरम्यान उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने या कारमधून प्रवास करत असलेले दाम्पत्य बचावल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रात्री पाऊणे आठच्या सुमारास घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकार नगर येथे राहणारे एक दाम्पत्य (नाव समजू शकलेले नाही) देहूरोड येथील आपल्या नातेवाईकांना भेटून आपल्या आय ट्वेंटी कारने (एमएच १२ एमएल ४५४१) पुण्याच्या दिशेने निघाले होते. देहू रोड येथील बावर्ची हॉटेलसमोर आल्यानंतर कारची समोरील लाईट बंद झाल्यामुळे ते रस्त्याच्या बाजूला थांबले. त्यानंतर अचानक कारमधून धूर येऊ लागला व पाहता पाहता कारने पेट घेतला. यामध्ये कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वेळेवर कारमधून बाहेर पडल्यामुळे पती-पत्नी वाचू शकले. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.