पुण्यातील येवलेवाडी येथील दांडेकरनगरमधील खाद्य पदार्थाच्या एका गोडाऊनला आज सकाळी लागलेली आग तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच आग नियंत्रणात आणताना तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.

अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले की, येवले येथील खाद्यपदार्थच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानंतर काही मिनिटात घटनास्थळी ८ गाड्या दाखल झाल्या. पण धुराचे प्रमाण अधिक असल्याने आग नियंत्रणात आणताना कर्मचार्‍यांना अडचणी देखील आल्या. या गोडाऊनमध्ये आतील बाजूला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर गोडाऊन परिसरात असलेल्या ट्रकला आग लागली. तसेच या गोडाऊनमध्ये चिप्स, तूप अशा खाद्यपदार्थांचे गोडाऊन असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी १२ गाड्या प्रयत्न करत होत्या. तब्बल तीन तासांच्या अवधीनंतर आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.