पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून ७ ते ८ भंगाराची गोदामं जळून खाक झाली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विनापरवाना चालत होतं अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे यांनी दिली आहे. महापौर राहुल जाधव यांनी घटनेसंबंधी माहिती दिली, तोपर्यंत अग्निशमन दलाला याची कल्पना नव्हती.

चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगाराची दुकानं, गोदामं असून मोठ्या प्रमाणावर आग लागल्याच्या घटना घडतात. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महापौर राहुल जाधव यांनी चिखली परिसरात आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन अग्निशमनच्या तब्बल १२ ते १५ वाहनांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये पिंपरी, प्राधिकरण,भोसरी,तळवडे,चिखलीसह अनेक अग्निशमन दलाच्या गाड्याच्या सहभाग होता.

७ ते ८ भंगार गोदामांना आग लागल्याच सांगण्यात येत असून हे सर्व विनापरवाना चालत असल्याचं समोर येतं आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. भंगाराच्या गोदाममध्ये प्लास्टिक, लाकूड, कागद असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. विनापरवाना भंगाराची गोदाम असलेल्या मालकांवर कारवाई होणार का हे आता पहावं लागणार आहे.