न्यायालयाचे आदेश धुडकावले

पुणे : फटाक्यांच्या  आतिषबाजीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश धुडकावून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात मोठय़ा प्रमाणावर फटाके वाजविण्यात आले. बुधवारी सायंकाळनंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात फटाक्यांमुळे सोळा ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. एकपाठोपाठ विविध ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली.

भवानी पेठेतील मध्यवर्ती अग्निशमन केंद्राच्या नियंत्रण कक्षातील दूरध्वनी रात्री उशिरापर्यंत खणखणत होता. सायंकाळी सातनंतर रात्री आग लागल्याच्या घटनांबाबत नागरिकांनी नियंत्रण कक्षाला माहिती देण्यास सुरुवात केली. रात्री अकरापर्यंत शहरात सोळा ठिकाणी आग लागल्याची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली. बहुतांश ठिकाणी आगीच्या घटना किरकोळ स्वरूपाच्या होत्या. फटाक्यांमुळे शहरातील गुरुवार पेठ, सदाशिव पेठ, कर्वे पुतळा, बावधन, सेनापती बापट रस्ता,  मॉडेल कॉलनी, औंध येथील सिंध कॉलनी, वानवडी, उंड्री, विमाननगर, खराडी या भागात आग लागली. झाडांच्या फांद्या, छतावरील पाचोळा तसेच गाडय़ांवर पेटता फटका पडल्याने आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. काही घरात पेटते अग्निबाण शिरल्याने पडदे पेटल्याच्या घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटना किरकोळ स्वरूपाच्या होत्या. मात्र, एकापाठोपाठ आग लागल्याच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहापर्यंत फटाके वाजविण्याचे आदेश दिले असताना शहरातील अनेक भागात सायंकाळी सहानंतर फटाक्यांचा दणदणाट सुरू होता.

याबाबत पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे (कंट्रोल रूम) तक्रारी देखील करण्यात आल्या. पोलिसांनी या घटनांची नोंद घेऊन तातडीने तेथे संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना रवाना होण्याचे आदेश दिले.