कोंढवा बुद्रुक येथील परांधेनगर येथे झोपडय़ांना लागलेल्या आगीत ३५ झोपडय़ा जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या चार बंबांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी हानी टळली. या झोपडय़ा येथे काम करणाऱ्या मजुरांच्या असून झोपडीबरोबरच मजुरांचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्यामुळे त्यांचे संसार उघडय़ावर आले आहेत.
कोंढवा बुद्रुक येथील परांधेनगर येथे साई सिव्र्हिस शोरुम जवळ सत्तर ते ऐंशी झोपडय़ा आहेत. त्या रांगेने उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी राहणारे सर्व जण मजुरीची कामे करतात. या झोपडय़ा पूर्णपणे लाकडापासून बनविलेल्या आहेत. या झोपडय़ांना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. याबाबत अग्निशामक केंद्राचे केंद्रप्रमुख गोरे यांनी सांगितले की, सकाळी दहा वाजून सात मिनिटांनी आग लागली असल्याचा नियंत्रण कक्षात फोन आला. त्यानुसार काही मिनिटांमध्ये एक अग्निशामक गाडी आणि दोन टँकर घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आगीने अनेक घरे वेढलेली होती. त्यामुळे आणखी  एक अग्निशामक गाडी आणि पाण्याचे टँकर बोलविण्यात आले. पावणेदहापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर आणखी एक पाण्याचे टँकर बोलवून तापलेले पत्रे आणि लाकडे विझविण्यात आली. नागरिकांनी आम्ही जाण्याअगोदरच दोन गॅस सिलेंडर बाहेर काढले होते. या झोपडय़ांमध्ये चुलीवर स्वयंपाक केला जातो. त्यातून एका झोपडीने पेट घेतला आणि नंतर आग पसरली असण्याची शक्यता आहे. इतर मजुरांच्या झोपडय़ा थोडय़ा उंचीवर असल्यामुळे त्यांना सुदैवाने काही झळ लागली नाही. या आगीमध्ये सुदैवाने कोणालाही जखम झालेली नाही. ही आग विझविण्यासाठी संजय जाधव, योगेश माने, संदीप जगताप, स्वप्निल फुले, उमेश माने, दुधाने यांच्याबरोबर पंधरा ते वीस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.