आग लागल्यानंतर होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आग प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृतीकरीता पुण्यात एका नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ‘वा.भा.तु.ली.’ला प्रथम, ‘संक्रमण प्रायोगिक रंगमंच’ला द्वितीय तर ‘नाट्यहोलिक क्रिएशन’ या नाट्य गटाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विजेत्यांना करंडक आणि प्रमाणपत्रसह अनुक्रमे रु. २५,०००, रु. १५,००० आणि रु. १०,००० चे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी भारत इंग्रजी शाळेचे ६१ विद्यार्थी आणि ७० नाट्य कलाकार उपस्थित होते.

७३ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘सेफ किड्स फाऊंडेशन आणि हनीवेल इंडिया’ यांनी पुणे अग्निशमन विभागाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी ‘आग विझवण्यापेक्षा आग प्रतिबंध योजना नेहमी चांगली’ या विषय देण्यात आला होता. शिवाजीनगरच्या घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात ही स्पर्धा पार पडली.

यावेळी पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, “सेफ किड्स फाऊंडेशन २०१५ पासून पुणे महापालिका अग्निशमन विभागाच्या सोबत काम करत आहे. शाळा व समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी फाउंडेशनने कौतुकास्पद काम केले आहे, संस्थेच्या प्रयत्नांमुळे शहरातील आगीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत झाली आहे”

सेफ किड्स फाऊंडेशनच्या कार्यक्रम संचालिका डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या, “महिनाभरापूर्वी सुरतमधील एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत २२ निरपराध मुलांचा मृत्यू झाला होता तर सात मुले गंभीर जखमी झाले होते. अशा प्रकारे आगीपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय न केल्यामुळे भाजल्याने झालेल्या जखमांमुळे दरवर्षी हजारो मुले आपला जीव गमावतात. मुलांमध्ये आग प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती व्हावी यासाठी ‘सेफ किड्स फाऊंडेशन’ वर्षभर विविध स्पर्धांच्या आयोजनाद्वारे जनजागृतीचे काम करीत आहे.

यावेळी परीक्षक म्हणून विनिता पिंपळखरे, कु. अश्विनी मनीष यांनी काम पाहिले.