तुळशीबागेतील वाकणकर वाडय़ातील दुकानाला सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत बांगडय़ा, कॉस्मेटिक्स साहित्य, महिलांचे कपडे यांची दहा दुकाने जळून खाक झाली. अत्यंत छोटे रस्ते आणि वस्तीने गजबजलेल्या परिसरात लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाच्या जवानांनी तिन्ही दिशेने पोहोचून अध्र्या तासात नियंत्रण मिळवल्यामुळे अनर्थ टळला. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना तत्काळ सुरक्षित रीत्या बाहेर काढण्यात आले. रात्री आग लागल्यामुळे मोठी हानी टळली. या आगीत नुकसान किती झाले हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असण्याची शक्यता आहे.
अग्निशामक दलाचे अधिकारी समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारी गल्लीमध्ये वाकणकर वाडा आहे. या वाडय़ात असलेल्या छोटय़ा स्टॉल्समध्ये महिलांचे कपडे, पर्स, चप्पल, कॉस्मेटिक्स साहित्याची दुकाने आहेत. सोमवारी मध्यरात्री अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला तुळशीबागेतील वाकणकर वाडय़ातील दुकानाला आग लागल्याचा दूरध्वनी आला. तुळशीबाग येथे आग लागल्याचे समजताच त्या ठिकाणी नऊ गाडय़ा आणि तीन टँकर पाठवण्यात आले. आग लागली त्या ठिकाणी जाण्यास रस्ता निमुळता होता. त्याबरोबरच वाहतूक पोलिसांनी लावलेली बॅरिकेट्स होती. त्यामुळे अग्निशामक दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला होता. मात्र, हा परिसर पाहता विश्रामबाग वाडा, लक्ष्मी रस्ता अशा विविध बाजूंनी अग्निशामक दलाच्या गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. आग नियंत्रणात आणण्यासाठी तीनही बाजूने एकाच वेळी प्रयत्न सुरू केले, मात्र या दुकानात कपडे, कॉस्मेटिक्स साहित्य, महिलांच्या पर्स असे साहित्य असलेल्या दुकानांत आग भडकली होती. ही दुकाने पत्र्याची व छोटीछोटी होती. आग विझवण्यास सुरुवात केल्यानंतर दुकानाचे पत्रे खाली दबले. त्यामुळे पत्र्यांवरच पाणी जात होते. त्याच्या खाली आग कायम होती. अध्र्या तासांनी ही आग आटोक्यात आली.
तुळशीबाग हा दुकानांनी गजबजलेला परिसर आहे. त्याबरोबरच शेजारी लोकवस्ती असल्यामुळे नऊ अग्निशामक गाडय़ा आणि साधारण चाळीस जवान घटनास्थळी पोहोचले होते. अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली. मात्र, या आगीत किती नुकसान झाले आणि ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. ही आग विझवण्यासाठी केंद्रप्रमुख प्रकाश गोरे, राजेश जगताप, प्रभाकर उमरटकर, रामटेके आदींनी सहभाग घेतला.
सिंहगड रस्त्यावरील अगरवाल डेअरीला आग
सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे असलेल्या अगरवाल डेअरीला मंगळवारी पाहटे दोनच्या सुमारास आग लागली. यामध्ये साधारण दहा लाख रुपयांचे डेअरी साहित्य जळून खाक झाले. माणिकबाग येथे पाच मजली इमारतीमध्ये राजेश बन्सल यांची तळमजल्यावर अगरवाल डेअरी आहे. या डेअरीला पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये तळमजल्यावर ठेवलेले डेअरीचे साहित्य जळून खाक झाले. अध्र्या तासात ही आग आटोक्यात आणली.