पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली असून चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत ती पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली आहे.

”सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या गाड्या व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्याचे काम सुरू झाले. इमतारतीमधील सर्वजणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. पोलीस विभाग, अग्निशमन दल व सीरम इन्स्टिट्यूटकडून मिळालेल्या माहितीनुसार आतमध्ये कुणीही अडकलेलं नाही. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल, अशी अपेक्षा आहे. तसेच, करोना लसीची निर्मिती होत असलेल्या ठिकाणाचे या आगीमुळे काही नुकासान झाले नाही व लसींचा साठा सुरक्षित आहे.”असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्त यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

तसेच, आग लागलेल्या इमारतीतमध्ये एका प्रकल्पावर काम सुरू होते, सध्या कुठलेही प्रकारची निर्मिती प्रक्रिया सुरू नव्हती. त्या ठिकाणी नंतर निर्मिती प्रक्रिया सुरू होणार होती. असं सीरमकडून सांगण्यात आलं असल्याचं देखील अमिताभ गुप्ता यांनी यावेळी सांगितलं.