शाळांच्या आवारात फटाके वाजवू नयेत, अशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या असून परीक्षांच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर राज्यमंडळानेही याबाबत शाळांना सूचना दिल्या आहेत. फटाक्यांमुळे होणारे अपघात आणि प्रदूषणाबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे.
दहावी आणि बारावीचे निकाल आता तोंडावर आले आहेत. राज्यमंडळाने गुणवत्ता याद्या बंद केल्या तरीही शाळांमध्ये अजूनही निकाल जल्लोषात साजरे केले जातात. त्या वेळी शाळांच्या आवारात सर्रास फटाक्यांच्या माळाही लावलेल्या दिसतात. मात्र हा प्रकार बंद करण्याची सूचना शिक्षण विभागानेच शाळांना दिली आहे. शाळेच्या आवारात फटाके वाजवण्यासाठी शिक्षण विभागाने बंदी घातली आहे. निकालाच्या पाश्र्वभूमीवर काळजी घेण्याची सूचना राज्यमंडळाने शाळांना दिली आहे. शाळांच्या आवारात फटाके वाजवण्यासाठी बंदी असल्याची सूचना लावण्यात यावी, असेही शाळांना सांगण्यात आले आहे. विद्यार्थी प्रदूषणाबाबत संवेदनशील व्हावेत, यासाठी हे पाऊल शिक्षण विभागाने उचलले आहे.