दौंड शहरानजीक दुचाकीवरून आलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने केलेल्या गोळीबारात तिघे ठार झाले. ही घटना आज (मंगळवार) दुपारी पावणेदोनच्या सुमारास नगरमोरी चौकात घडली. गोळीबारानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा गोळीबार झाला असल्याची परिसरात चर्चा आहे. संजय शिंदे असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला अहमदनगरमधून अटक करण्यात आली आहे.  या हल्ल्यामुळे दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

संशयित आरोपी संजय शिंदे हा एसआरपीएफचा जवान आहे. त्याने आज दुपारी  गोपाल शिंदे (रा. वडार गल्ली, दौंड), प्रशांत पवार (रा. वडार गल्ली, दौंड) आणि अनिल विलास जाधव (रा. बोरावकेनगर, दौंड) यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. यातील दोघे मृत हे आपल्या दुचाकीवर जात होते. त्यावेळी शिंदेंने त्यांच्यावर गोळीबार केला. तर एकावर त्याच्या घरी जाऊन शिंदेने गोळीबार केला.

शिंदेने तिघांना ठार करून आपले घर गाठले व स्वत:ला बंद करून घेतले. पोलिसांना तो त्याच्या घरी असल्याचे समजताच त्यांनी घराला वेढा घातला. त्याला बाहेर येण्याचे आवाहन केले. पहिल्यांदा त्याने प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने स्वत:हून अटक करवून घेतली. आर्थिक व्यवहारातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी दौंड पोलीस अधिक तपास करत आहेत.