पुणे : पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरटय़ांनी पुणे-सातारा रस्त्यावरील कापूरहोळ गावातील एका सराफी दुकानात गोळीबार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. चोरटय़ांनी दागिने लुटले असून पसार झालेल्या चोरटय़ांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे.

कापूरहोळ परिसरात बालाजी ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरटय़ांनी सराफी दुकानाचा मालक आणि कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले आणि दागिन्यांची मागणी केली. सराफ तसेच दुकानातील कर्मचाऱ्याने विरोध केला असता चोरटय़ाने त्यांच्यावर पिस्तूल रोखून गोळीबार केला. गोळीबार झाल्याचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात घबराट उडाली. सराफी दुकानातील दागिने लुटून चोरटे पसार झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सराफी दुकानातून नेमका किती ऐवज लुटण्यात आला, याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.