मंगळवार पेठेतील घटना; तेरा जणांविरोधात गुन्हा

पुणे : मद्यपानाचे तसेच जेवणाचे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर झालेल्या वादाचे हाणामारीत आणि गोळीबारात रुपांतर झाले. ग्राहक आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडली. हॉटेलमधील सुरक्षारक्षकाने या घटनेत गोळीबार केला. ही घटना मध्यरात्री मंगळवार पेठेत घडली.

या प्रकरणी तेरा जणांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहक अक्षय सुभाष काळोखे, संतोष बाळासाहेब बोराटे, सागर सुभाष आगलावे तसेच हॉटेलमधील कर्मचारी मदन चंद्रभान कुंवर, विष्णू नरबहाद्दूर खडका, ग्यानींदर नीरव कँुवर, प्रवीण सतीश पाटील, सनीदुल हमीदूल इस्लाम, कमल मकाजत कुँवर, विशाल केशव कुटे, संजय शामराव पाटील, आनंद कृष्णनाथ महाडिक आणि गोळीबार करणारा सुरक्षारक्षक महिमाशंकर तिवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी रविकांत कदम यांनी यासंदर्भात समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळोखे, बोराटे, आगलावे सोमवारी रात्री मंगळवार पेठेतील पारगे चौकात असलेल्या वसंत बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिघांनी मद्यपान तसेच जेवण केले. त्यानंतर ते घरी निघाले. तिघांनी मद्याचे तसेच जेवणाचे पैसे देण्यास नकार दिला. या कोरणावरून हॉटेलमधील कर्मचारी आणि काळोखे, बोराटे, आगलावे यांच्यात वाद सुरू झाला. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. हॉटेलमधील सुरक्षारक्षक तिवारीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी तिवारी याच्याशी वाद घालून त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर तिवारीने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.