News Flash

सूस टेकडीवर पोलिसांवर एअरगनमधून गोळीबार

पोलीस हवालदार बबन मारुती गुंड आणि शिपाई अमर अब्दुल शेख अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

दोन पोलीस जखमी, पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र सुरू

मुंबई, ठाणे परिसरात पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना ताज्या असतानाच पाषाण-सूस रस्त्यावर असलेल्या टेकडीवर शनिवारी (३ सप्टेंबर) रात्री गस्त घालण्यासाठी गेलेल्या दोघा पोलिसांवर एअरगनमधून गोळीबार करण्यात आला. गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस हवालदार बबन मारुती गुंड आणि शिपाई अमर अब्दुल शेख अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी तीन हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गुंड यांनी या संदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुंड यांच्या बरगडीच्या भागात छर्रा शिरल्याने ते जखमी झाले. तर शेख यांच्या कपाळावर एअरगनच्या लाकडी दस्ता मारल्याने ते जखमी झाले आहे. गुंड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती चतु:शंृगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिली.

सूस खिंड भागातील पाषाण टेकडीवर लुटमारीच्या घटना घडतात. त्यामुळे पोलिसांकडून तेथे रात्रीच्या वेळी पोलिसांकडून गस्त घालण्यात येते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास हवालदार गुंड आणि शेख टेकडीवर गस्त घालण्यासाठी गेले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास तिघे जण टेकडीच्या परिसरातून निघाले होते. गुंड आणि शेख यांना संशय आल्याने त्यांनी तिघांना थांबण्याची सूचना केली. तिघा संशयितांची झडती घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या वेळी तिघांनी गुंड आणि शेख यांच्याशी झटापट केली. पसार होण्याच्या तयारीत असलेल्या एकाला त्यांनी पकडले. त्याने त्याच्याकडील एअरगनमधून गुंड यांच्या दिशेने गोळी झाडली. त्यानंतर शेख यांच्या कपाळावर एअरगनचा लाकडी दस्ता मारला. अंधाराचा फायदा घेऊन तिघे जण पसार झाले. गुंड यांच्या बरगडीत छर्रा शिरला. तर शेख यांच्या कपाळावर जखम झाली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पोलीस निरीक्षक ढोमे यांनी सांगितले.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहे. हल्लेखोरांचे वर्णन मिळाले असून पाषाण-सूस भागातील सराइतांकडे चौकशी करण्यात येत आहे. सूस खिंडीतील टेकडीची पाहणी करण्यात आली आहे. अद्याप हल्लेखोरांविषयी फारशी माहिती मिळाली नाही. 

-दयानंद ढोमे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:शृंगी पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 3:55 am

Web Title: firing from air guns on police in pune
Next Stories
1 प्रवासी बसच्या डिकीतून ‘स्पेशल बर्फी’ची वाहतूक
2 गणेशोत्सवासाठीची महापालिकेची तयारी पूर्ण
3 मानाच्या गणपतींची माध्यान्हीपूर्वीच प्रतिष्ठापना
Just Now!
X