पुणे शहरात मागील काही दिवसात खून आणि चोरीच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर, एका वृद्ध नागरिकावर गोळीबार झाल्याची धक्कदायक घटना भरदिवसा घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटेनेतील वृद्ध व्यक्तीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजेश कनाबर(वय-६३) असे या घटनेतील मृत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयपासून काही अंतरावर एसबीआय बँकेची ट्रेझरी आहे. त्या बँकेच्या बाहेरील फुटपाथवर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी एका वृद्ध नागरिकावर गोळीबार केला. यामध्ये संबधित वृद्ध व्यक्ती खाली कोसळल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी व्यक्तीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्याना त्यांचा मृत्यू झाला. या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसाकडून सांगण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 4:45 pm