पुण्यातील वकील अॅड. देवानंद ढोकणे यांचावर गोळीबार करून खुनी हल्ला करणाऱ्या आरोपी क्रीमदास बढे याला पुणे न्यायालयामध्ये वकील संघटनेकडून मारहाण करण्यात आली. पुण्यातील संगमवाडी पुलावर रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अॅड. ढोकणे यांच्यावर गोळीबार झाला होता. यावेळी हल्लेखोर गोळी झाडून पसार झाले होते. गोळीबारात जखमी झालेल्या ढोकणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोळीबारात ढोकणे यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. वकीलांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध वकीलांनी केला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल न्यायालयाच्या कामकाजावर अनेकांनी बहिष्कार टाकला होता. तर या प्रकरणातील दोन आरोपीना गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने चाकण येथून अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून पिस्तुल आणि दुचाकी जप्त करण्यात आल्यानंतर या आरोपीना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी आरोपींना न्यायालयाबाहेर घेऊन जात असताना काही वकीलांनी त्यांना मारहाण केली. याबरोबरच ‘वकील एकता झिंदाबाद’ अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाल्याचे चित्र होते. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत ढोकणे कुटुंबीयांकडून पोलीस माहिती घेत असून त्यांचे कोणाशी वैमनस्य होते का, याचा पोलीस तपास करत आहेत.