पुण्यामध्ये चोरट्यांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. चोरीचा डाव फसल्यानंतर पळून जाण्यासाठी चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि पळ काढला. गोळी चुकविल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरील वर्धमान ज्वेलर्सच्या समोर मध्यरात्री घडली. सराफी दुकानाचे शटर उचकटण्याच्या प्रयत्नात चोरटे असतानाच तेथे गस्तीवरील बीट मार्शल आल्याने त्यांचा चोरीचा डाव फसला. खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी माधव कोपनर आणि त्यांचे सहकारी बुधवारी रात्री बीट मार्शल ड्यूटीला होते. त्यावेळी ते परिसरात गस्त घालत असताना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरील वर्धमान ज्वेलर्सजवळ त्यांना हालचाल दिसली. तेथे दोन ते तीनजण दुकानाचे शटर उचकटताना दिसले. पोलिसांनी पाहून चोरटे घाबरले आणि त्यातील एकाने थेट पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.
ती कोपनर आणि त्यांच्या सहकाऱ्याने चुकविली. परंतु ती शेजारील एका खासगी वाहनाला लागली. त्यानंतर चोरट्यांनी एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधू पोबारा केला. पळालेल्या चोरट्यांचा खडकी पोलीस शोध घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 10:09 am