नव्या शैक्षणिक वर्षांचा पहिला दिवस आनंददायी

‘आई, तू जाऊ नकोस ना, मला नकोय शाळा,’ अशी किंचाळत मारलेली हाक.. पुन्हा मित्र-मैत्रिणी भेटल्याने झालेला आनंद.. रिक्षा-व्हॅनच्या काकांचा हात धरून पाहिलेला नवा वर्ग.. शिक्षक आणि मदतनिसांची अव्याहत सुरू असलेली धावपळ.. छोटय़ांचे रडणे, गाणी-गोष्टी-गप्पा अशा किलबिलाटाच्या वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षांचा पहिला दिवस शुक्रवारी साजरा झाला.

जवळपास दोन महिन्यांच्या सुटीनंतर परतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी कल्पकतेने तयारी केली होती. सनईचे सूर, रांगोळीच्या पायघडय़ा, फुगे, फुलांनी शाळेत केलेली सजावट, खाऊ, मुलांच्या आवडीच्या डोरेमॉन, छोटा भीम अशा कार्टून व्यक्तिरेखा असे धमाल वातावरण शाळांमध्ये होते. हे वातावरण पाहून मुले हरखून गेली होती. सरस्वती पूजन आणि खाऊ वाटप झाल्यावर आई-बाबा सोडून जात असल्याचे पाहून खेळगट आणि केजीच्या मुलांना दुख अनावर झाले होते. अशा अनेक मुलांनी तर रस्त्यावरच भोकाड पसरले होते. अशा मुलांना सांभाळताना शिक्षक आणि मदतनिसांची तारांबळ उडाली. तर मोठय़ा मुलांना पुन्हा मित्रमंडळींना भेटण्याची उत्सुकता होती.

अभिनव मराठी विद्यालयात ढोलताशा आणि सनईच्या सुरांच्या साथीने विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. मा. स. गोळवलकर गुरुजी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर न करण्याचे गाणे गायले. शाळेतील शिक्षकांप्रमाणेच गणेशोत्सव मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांनी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. सेवा मित्र मंडळातर्फे लोकमान्य टिळक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशातील कलाकारांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्या निकेतन प्रशाला क्रमांक १ मध्ये रेवडी आणि गुलाबपुष्प देऊन मुलांचे स्वागत केले. अप्पा बळवंत चौकातील नूतन मराठी विद्यालयात साईनाथ मित्रमंडळ ट्रस्टतर्फे स्वागत संत गाडगेबाबा यांच्या वेशातील कलाकारांनी केले. विद्यार्थ्यांसह शाळेचा परिसर स्वच्छ केला. रमणबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकनगरी या नाटिकेतून नवीन मराठी प्रशालेच्या बालमित्रांचे स्वागत केले.

ठिकठिकाणी ‘ट्रॅफिक जॅम’!

शाळेच्या पहिल्याच दिवशी अनेक पालकांना ट्रॅफिक जॅमला सामोरे जावे लागले. विशेषत मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जवळपास दोन महिने बंद असलेल्या स्कूलव्हॅन-रिक्षांची गर्दी, विद्यार्थ्यांना दुचाकी-चारचाकीने सोडायला आलेले पालक  यांमुळे शाळांच्या बाहेर वाहतुकीचा खोळंबा झाला.