खासदार व्हायची इच्छा व्यक्त केलेल्या एका विद्यार्थीनीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आधी आपला प्रचार करण्याचा सल्ला एका कार्यक्रमात दिला. त्यानंतर मोठं झाल्यानंतर तुला खासदारकीचे तिकीटही देऊ, असेही त्यांनी मजेमध्ये म्हटले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील ६ हजार मुलींना सायकलचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुळे यांनी या कार्यक्रमात मुलींना कोणाला काय व्हायला आवडेल असा प्रश्न विचारला त्यावर अनेक मुलींनी आपल्या विविध इच्छा व्यक्त केल्या. यावेळी एका मुलीने मला खासदार व्हायचे आहे, असे म्हटले त्यावर आता माझा प्रचार करं मग तुला खासदारकीचे तिकीट देऊ, असे सुप्रिया सुळे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

तसेच मुलींनो खूप मोठे व्हावा पण मोठे झाल्यावर मला विसरु नका, कोणी पोलीस झाले आणि माझ्याकडून जर सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन केले असेल तर सॉरी म्हटल्यावर मला सोडून द्या, असे सुप्रिया सुळेंनी म्हणताच पुन्हा एकदा सभागृहातील वातावरण हशांनी हलके फुलके झाले. मला माझा मतदारसंघ कुपोषण मुक्त करायचा असून येत्या दोन वर्षात बारामती मतदारसंघ कुपोषण मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शरद पवार म्हणाले, आतापर्यंत मुलींना सायकली दिल्या आहेत. याचा एका मुलीचा बाप असल्याने मला आनंद वाटतो. तर आज अखेर २५ हजार सायकलचे मुलींना वाटप करण्यात आले. पण मुलांना सायकली देण्यात आल्या नाहीत. ही माझी तक्रार असून यात बदल करुन पुढच्या वर्षी मुलांना देखील सायकलींचे वाटप करण्यात यावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावेली केल्या.