24 February 2021

News Flash

प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय पुण्यात

डॉ. कस्तुरी भडसावळे म्हणाल्या, भारतात पशू आरोग्य सेवेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सुधारणा होत आहेत.

डॉ. कस्तुरी भडसावळे यांनी पुण्यात प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय सुरू केले आहे.

पाळीव प्राण्यांच्या डोळय़ांच्या आजारांवर उपचार; तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शहरीकरणाबरोबर घरांचा आकार बदलला तसे पाळीव प्राणीदेखील उंबरठय़ाबाहेरून घरात आले आहेत. प्राण्यांचे पालक कुटुंबातील सदस्यांइतकेच आपल्या पाळीव प्राण्यांच्या सुखसुविधांचीही काळजी घेताना दिसतात. प्राण्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, उपाहारगृहे, खेळघर असे अनेक पर्याय उपलब्ध होत असतानाच आता पुण्यात प्राण्यांसाठीचे देशातील पहिले नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.

‘विवेट मल्टीस्पेशालिटी क्लिनिक’तर्फे बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावर हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. डॉ. कस्तुरी भडसावळे या पशु नेत्रतज्ज्ञ महिलेच्या कल्पनेतून या नेत्र रुग्णालयाची स्थापना झाली आहे. ‘द आय वेट’ असे या नेत्ररुग्णालयाचे नाव असून श्वान, मांजर अशा पाळीव प्राण्यांबरोबरच इतर सर्व प्राण्यांच्या नेत्रविकारांवर देखील या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत.

डॉ. कस्तुरी भडसावळे म्हणाल्या, भारतात पशू आरोग्य सेवेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सुधारणा होत आहेत. मात्र पाळीव प्राण्यांच्या नेत्रविकारांवर उपचार करणारी केंद्र आपल्याकडे अद्याप नाहीत. माणसांमध्ये दिसणारे डोळ्यांचे सर्व प्रकारचे विकार हे प्राण्यांमध्येही दिसतात. पशुवैद्यक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेण्यापलिकडे त्यावर फारसे पर्याय उपलब्ध नसतात. त्यामुळे दृष्टी गमावलेले अनेक प्राणी आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. प्राण्यांच्या डोळ्यांची घ्यावयाची काळजी, डोळ्यांवर करण्यात येणाऱ्या मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रिया या नेत्र रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तबेल्याला भेट देऊन घोडय़ांमध्ये आढळणारे दुर्मीळ आणि गुंतागुंतीचे नेत्रविकार हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सहकाऱ्यांची नियुक्ती रुग्णालयात करण्यात आली आहे.

पाळीव प्राण्यांकडे आता केवळ सोबत म्हणून पाहिले जात नाही तर कुटुंबाच्या सदस्यासारखी वागणूक त्यांना दिली जाते. शहरी भागातील विभक्त कुटुंब पद्धती, आर्थिक सुबत्ता यांमुळे पालक आपल्या पाळीव प्राण्यांसाठी अत्याधुनिक तपासणी आणि निदान पद्धती, वैद्यकीय सेवांची मागणी करतात. घरातील सदस्यांप्रमाणे पाळीव प्राण्याशी देखील त्यांचे भावनिक नाते जुळलेले असते. शहरातील अनेक बंगले आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये पाळीव प्राणी राहतात. त्यांच्या आरोग्याबाबत अनेकजण दक्ष असतात,

त्यामुळेच प्राण्यांच्या उत्तम आरोग्याबाबत विविध जनजागृती शिबिरे आणि कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ‘द आय वेट’तर्फे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 3:10 am

Web Title: first eye hospital in the country for animals in pune
Next Stories
1 दोन वर्षांत काम पूर्ण?
2 कुटुंब रंगलंय ‘सावरकर भक्ती’त!
3 ‘ड्रग फ्री इंडिया’ मोहिमेला महाविद्यालयांमध्ये प्रारंभ
Just Now!
X