जादूटोणा विरोधी कायद्यानुसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये शहरातील पहिला गुन्हा दाखल झाला असून, एका पूजेसाठी मुलीला डोक्यावरचे केस काढून टाकण्याबरोबरच नग्नावस्थेत पूजेत सहभागी होण्याबाबत पैशाचे आमिष दाखविण्यात आले होते. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
हमीदा आयुब शेख (रा. शांतीनगर, येरवडा) या महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यय्यद आलम नावाचा मांत्रिक फरार झाला आहे. संबंधित मुलीचे केस मोठे असल्याने पूजेसाठी हे केस काढून देण्याची व नग्नावस्थेत पूजेला बसण्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी तीन लाख रुपये देण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानुसार जादूटोणा विरोधी कायद्यानुसार त्याचप्रमाणे विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे म्हणाले की, या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला असून, महिलेला अटक करण्यात आली आहे.