‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्राथमिक फेरी उद्यापासून

पुणे : राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागातील प्राथमिक फेरीला उद्या (५ डिसेंबर) सुरुवात होत आहे. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांच्या नाटय़ विभागांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेने गेली काही वर्षे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विभागीय प्राथमिक फेरी, त्यानंतर विभागीय अंतिम फेरी आणि अखेरीस मुंबईमध्ये रंगणारी महाअंतिम फेरी यांमुळे या स्पर्धेत राज्यातील सर्व विभागातील महाविद्यालयांचे विद्यार्थी एकत्र येतात. विषयांची वैविध्यपूर्ण हाताळणी, राज्यभरातील संघांमध्ये होणारी चुरस यांमुळे मराठी नाटय़ आणि चित्रपट सृष्टीतील मान्यवरांचे देखील या स्पर्धेकडे विशेष लक्ष असते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेले राज्यस्तरीय व्यासपीठ म्हणून या नाटय़जगतातील एक महत्त्वाची स्पर्धा असा लौकिक लोकसत्ता लोकांकिकाने प्राप्त केला आहे.  उद्या आणि परवा (५, ६ डिसेंबर) होणाऱ्या पुणे विभागीय प्राथमिक फेरीबाबत विद्यार्थी जगतामध्ये उत्साह आणि कुतुहलाचे वातावरण आहे. सहभागी महाविद्यालयांबरोबरच इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी देखील या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देतात. दोन दिवस चालणारी पुणे विभागीय प्राथमिक फेरी ही तालीम स्वरूपातील असल्याने सहभागी संघ तयारीवर शेवटचा हात फिरवत आहेत. अखेरच्या टप्प्यात चुरशीने तालीम करण्याबरोबरच नेपथ्य, पाश्र्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा यांचा विचार करण्याला विद्यार्थी प्राधान्य देत आहेत.

लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेचा भाग होणं ही आम्हा सगळ्यांसाठीच अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे अत्यंत उत्साहाने आम्ही या स्पर्धेसाठी तयारी करत आहोत. याआधी देखील आम्ही काही स्पर्धामध्ये हे नाटक केलंय, पण लोकसत्ता लोकांकिकासाठी काही बदल केले आहेत. आमचा संपूर्ण संघ प्रथमच लोकांकिका करत आहे,त्यामुळे उत्साह, कुतूहल आणि थोडंसं दडपणसुद्धा आहे. मात्र, लोकसत्ता लोकांकिकामध्ये आपलं नाटक सादर करणे हा अनुभव म्हणून आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या प्राथमिक फेरीकडे आम्ही डोळे लावून बसलो आहोत.

– मुक्ता पाध्ये, फग्र्युसन महाविद्यालय.

खूप वर्षांनी आमच्या महाविद्यालयाचा संघ लोकसत्ता लोकांकिका करतो आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील अनेक विद्यार्थ्यांबरोबर नाटक अनुभवता येणार म्हणून आम्ही सगळेच प्रचंड उत्साहात आहोत. नाटक करताना सगळ्यांनाच काम करण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही विचारपूर्वक प्रयत्न करतो. प्रमुख सात भूमिका करणारे मित्र-मैत्रिणी सोडता, इतर सर्व भूमिका आलटून पालटून सर्वाना मिळावी याची खबरदारी आम्ही घेतो. अनेक स्पर्धामध्ये आम्ही आयरनीच्या देवा सादर केली आहे, मात्र प्रथम पारितोषिक अद्याप आम्ही जिंकलेलो नाही, लोकसत्ता लोकांकिकाच्या प्राथमिक फेरीपासूनच प्रथम पारितोषिकासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत.

– सुधांशू देशपांडे, एमआयटी डब्ल्यूपीयू.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या साहाय्याने पार पडणार आहे. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ हे  असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावर कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.