राहुल खळदकर

ग्रामीण भागातील बँका तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून गस्त घालण्यात येते. गस्तीवर असणारे पोलीस महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या नोंदवहीत प्रत्यक्ष भेट दिल्याची नोंद करतात. पुणे ग्रामीण पोलिसांनी या पारंपरिक गस्ती पद्धतीला आधुनिक यंत्रणेची जोड दिली असून या यंत्रणेला ई-पेट्रोलिंग असे नाव देण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात ई-पेट्रोलिंग यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागाचा विस्तार मोठा असतो. त्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडते. ग्रामीण भागातील पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आर. एफ. आय. डी. (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफेकिशन डिव्हाईस) या यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ते म्हणाले, या योजनेअंतर्गत पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्य़ातील बारामती शहर, इंदापूर, दौंड, लोणावळा  शहर, शिरूर, खेड या पोलीस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर या यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्यात ही यंत्रणा यशस्वी ठरल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या उर्वरित २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांची हद्द तसेच नकाशा विचारात घेण्यात आला आहे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात मंदिर, प्रार्थनास्थळे, पुतळे, शाळा, महाविद्यालय, बँका, एटीएम केंद्र, पतसंस्था, महत्त्वाचे चौक, उपाहारगृहे, चाळ, रेल्वे आणि एसटी स्थानक, सराफ बाजार आदी स्थळांचा समावेश आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाची ५० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या तांत्रिक प्रणालीची माहिती देण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ  पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कामचुकारांना चाप

या पूर्वी पेट्रोलिंग करणारे पोलीस ठाण्यातील कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणी भेट देऊन पुस्तिकेवर सही करायचे. बऱ्याचदा पोलीस कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणांना रात्रपाळीत भेट द्यायचे नाहीत तसेच आठवडय़ातून एकदा भेट द्यायचे आणि एकाच वेळी आठवडाभराच्या सह्य़ा करून मोकळे व्हायचे. आर. एफ. आय. डी. यंत्रणेमुळे कामचुकारांना चाप बसणार आहे. गस्त घालण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना सबब देता येणार नाही. घटनास्थळी भेट देणाऱ्या प्रत्येकाची माहिती या यंत्रणेद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑनलाइन उपलब्ध होईल.

ई-पेट्रोलिंग म्हणजे काय?

आर. एफ. आय. डी. तंत्रज्ञानावर आधारित असलेले यंत्र घेऊन पोलीस रात्रपाळीत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणार आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या यंत्रणेत असलेल्या टॅगला (कळ) पोलिसांकडे असलेल्या यंत्रणेचा स्पर्श झाल्यानंतर ते यंत्र संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने गस्तीच्या स्थळी भेट दिल्याबाबतची नोंद करेल. या यंत्रणेमुळे गस्तीवरील पोलिसांना नेमून दिलेल्या गस्तीच्या प्रत्येक ठिकाणाला भेट द्यावी लागेल.