18 October 2018

News Flash

बाजारभेट : मासळी बाजार

मासळीचे प्रकार आणि पुरवठय़ाची ठिकाणे जाणून घेणे इथे उपयुक्त ठरेल.

सळीचा नुसता विषय निघाला तरी आजही कोणत्याही ग्रुपमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. तो विषय पण नको, असे म्हणणारी जेवढी मंडळी असतात तेवढीच, तोंडाला पाणी सुटणारी मंडळी देखील असतात. देशाच्या सर्व प्रांतातील, जाती-धर्माची माणसे पुण्यामध्ये राहत असल्याने, शाकाहारी बरोबर मांसाहारी पदार्थाचीही बाजारपेठ पुण्यामध्ये लक्षवेधी प्रमाणात असणे, यात वावगे काहीच नाही. पुण्यातील मासळी बाजाराचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

शहराच्या विकासाबरोबरच बाजारपेठेचे विकेंद्रीकरण होणे स्वाभाविक आहे. सद्य:स्थितीत मुख्यत्वे लष्कर भागातील शिवाजी मार्केट आणि गणेश पेठेत मासळीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होतात. त्याचबरोबर खडकी, औंध, विश्रांतवाडी, गंजपेठ, स्वारगेट, ढोले पाटील रोड, येरवडा, हिंजवडी, बालेवाडी, थेरगाव याभागातही मासळी विक्रीची दुकाने आहेत. भोई समाजाचे वर्चस्व असलेल्या या बाजारपेठेत आता इतर समाजबांधव देखील मोठय़ा प्रमाणावर असल्याचे समजले.

मासळीचे प्रकार आणि पुरवठय़ाची ठिकाणे जाणून घेणे इथे उपयुक्त ठरेल. मुख्यत्वे किनारपट्टी भागातून सागरी मासळीचा पुरवठा होतो. वेरावळ (गुजराथ), काकीनाडा (आंध्र), पारादीप (ओरिसा), मछलीपट्टण, पाँडीचेरी आणि तामिळनाडू भागातून, तसेच महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी पट्टय़ातून मासळीचा पुरवठा होतो. गोडय़ा पाण्यातील मासळीचा पुरवठा, भीमावरम (आंध्र), तसेच महाराष्ट्रातील नरसापूर, भिगवण, खडकवासला या भागातून होतो. माशांच्या जातीमध्ये पापलेट, सुरमई, कोळंबी, खजुरी, वांब, बोंबील, शार्क, मरळ, स्टारफिश, घोळ, करिमीन, कतला, बोई, माकूल, तामोशी, मायंदळी, वेरली, बांगडा, मोहरी, हलवा, रावस, टायगर, किंग कलाई अशी चाळीसपेक्षा अधिक नावे समजली.

मच्छी व्यावसायिकांच्या विभागवार अनेक संघटना आहेत. विशेषत्वे, स्थानिक समस्यांची सोडवणूक, प्रशासनाशी सुसंवाद, बाजारभाव नियंत्रण एवढीच मर्यादित कामे होतात. पुण्यात गणेश पेठेतील मच्छीबाजार सर्वात मोठा असून, येथे ४८ विक्रेते सामावले आहेत. नवीन जागेत स्थलांतराच्या प्रतीक्षेत असलेला हा बाजार सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सोयी सुविधांअभावी मार्गक्रमण करतो आहे. मध्यवस्तीतील या बाजाराला सुलभ वाहतुकीची जोड मिळणे अत्यावश्यक वाटते.

मासळीचे पदार्थ हे जिभेचे चोचले पुरवणारे तसेच काही आजारांवर औषध म्हणूनही उपयुक्त असल्याची माहिती मिळाली. मासळीपासून तयार केलेल्या चविष्ट पदार्थामध्ये कोळंबी वडा, भरला बांगडा, झिंगा फ्राय, कोळंबी तवा, कोळीवाडा हे पदार्थ लोकप्रिय असल्याचे समजले. मासळी समान असली तरी प्रादेशिक मसाल्यांची चव आणि स्वयंपाकाच्या परंपरागत हातोटीमुळे पदार्थ रूचकर होतात हे सर्वज्ञात आहे. मासळी विक्रीच्या व्यवसायात भोई समाजाचा पूर्वापार मोठा सहभाग असला, तरी आता हे प्रमाण २५ टक्के इतके झाले आहे. त्याला कारणे देखील अनेक आहेत. पुणे शहरात या समाजाची सुमारे चार हजार घरे असल्याचे समजले. पूर्वी कसब्यात केंद्रित असलेला हा समाज, शहर विकासाबरोबर आणि मुख्यत्वे पानशेत पुरानंतर पर्वती, लक्ष्मीनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर आणि पौड रोड परिसरात विखुरला गेला. शिक्षण आणि रोजगाराच्या उपलब्धीमुळे विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आणि अनेकांनी परंपरागत व्यवसाय सोडून विविध क्षेत्रांत सहभाग घेण्यास सुरुवात केली. प्रशासन, व्यापार, वकिली, वैद्यकीय, साहित्य, कला अशा क्षेत्रात या मंडळींनी कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या अन्य भटक्या जमाती या प्रवर्गात, तर केंद्र शासनाच्या ओबीसी इतर मागासवर्गीय या विभागात हा समाज समाविष्ट आहे. या सोयीसवलतींचा लाभ घेऊन काही जणांनी निश्चितच विकास साधला असला तरी बहुसंख्य समाज अजूनही वंचित आणि उपेक्षित असल्याचे कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेतून जाणवले.

पुण्यनगरीमध्ये या समाजाच्या काही नामवंतांनी स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. कै. बबनराव परदेशी, विशाल परदेशी, कै. बाळासाहेब भोकरे, सायकलपटू केशवराव गायकवाड, जयंत भोकरे, गणेश शिंदे (डीसीपी), गजानन भोकरे, कै. भाऊसाहेब कारळे, कै. गोविंद तारू, चंद्रशेखर भोई (शरीरसौष्ठव), मयूर भोकरे (प्रशासन), डॉ. मिलिंद भोई (वैद्यकीय, सामाजिक) अशा अनेकांनी सार्वजनिक क्षेत्रामध्ये समाजाचा लौकिक वाढवला आहे. समाजाची स्वत:ची जात पंचायत आणि नोंदणीकृत संस्था असून, जातीबांधवांच्या विकासासाठी काही प्रकल्प सातत्याने राबवले जातात. शशिकांत परदेशी, सुनंदा गायकवाड, दिगंबर तारू, सहदेव मखामले, गोपीनाथ परदेशी यांचे संघटन क्षेत्रात विधायक कार्य आहे.

समस्त भोई पंच मंडळी ही समाजाची शिखर संस्था आहे. राज, परदेशी, कहारू, पालेवार, नावाडी, दुराया, झिंगा, मच्छिंद्र, जालिया या आणि अशा एकूण २६ उपजाती समाजात आहेत. धार्मिक विधी, तंटामुक्ती, शैक्षणिक महत्त्व, गणेशोत्सव, दहीहंडी संघ, व्यायामशाळा, जीवरक्षक सेवा, स्वतंत्र वारकरी दिंडी, वधू-वर मेळावा असे अनेक समाजोपयोगी उपक्रम, ज्ञाती संस्थेतर्फे चालवले जातात. कसब्यातील इतर अठरा पगड जाती-जमातींच्या तुलनेत हा समाज प्रगतीच्या तुलनेत थोडा मागे आहे, ही बाब प्रकर्षांने जाणवते. सक्षम, सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव आणि विकसित समाजबांधवांची, बहुतांश निष्क्रियता हीच याची कारणे जाणवतात. समाजातील अनेक घटक आणि संघटनांचा परस्परांमधील विसंवाद हेदेखील महत्त्वाचे कारण समजले. समाज-संघटनेचे अध्यक्षपदी अ‍ॅड. श्रीकांत पाटील हे असून, ज्योतीबा शिर्के (कार्याध्यक्ष), संजय तारू (चिटणीस) आहेत. समस्त भोईराज मंडळाचे प्रफुल्ल गवळी हे अध्यक्ष आहेत. भोई समाजातील बहुसंख्य मंडळी भोकरे, तारू, तिकोने, शिनगारे, ढगे, नंदनवार, शिर्के, गायकवाड अशा आडनावांची आहेत.

बाजारपेठ भ्रमंतीच्या निमित्ताने एक बाब प्रकर्षांने जाणवली. व्यवसायवृद्धी ही होत राहणारच आहे. परंतु, आकडेवारीबरोबर तेथील माणसाचा सर्वागीण विकासाचा आलेख देखील उंचावला पाहिजे. या लेखनासाठी चेतन शिवले, शशिकांत परदेशी, दिगंबर तारू, डॉ. मिलिंद भोई, ज्योतिबा शिर्के, सुनंदा गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.

First Published on December 7, 2017 3:31 am

Web Title: fish market shivaji market ganesh peth fish market