कोरगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना अटक केली. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगाव येथे दंगल उसळली होती. या परिषदेच्या आयोजनाचा ठपका ठेवत कथित नक्षलवादी समर्थक वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा या पाच जणांना पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. जाणून घेऊयात या पाच जणांबद्दलची माहिती……

सुधा भारद्वाज :
२००७ पासून सुधा भारद्वाज छत्तीसगड कोर्टामध्ये वकिलीचा व्यवसाय करत आहेत. सुधा भारद्वाज या आयआयटी कानपूरच्या 1978 च्या बॅचच्या टॉपर आहेत. तर २०००मध्ये त्यांनी रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापिठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. कामगार नेते कामगार नेते दिवंगत शंकर गुहा नियोगी यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन सुधा भारद्वाज या डाव्या चळवळीशी जोडल्या गेल्या. 30 वर्षांपासून सुधा भारद्वाज ट्रेड युनियनच्या नेत्या म्हणून काम करत आहेत. मानवाधिकार चळवळीतल्याही त्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. छत्तीसगड पीपल्स यूनियन फॉर सिव्हिल लिबर्टिजच्या त्या सरचिटणीस असून, ‘जनहित’ संघटनेच्या संस्थापक आहेत. सुधा भारद्वाज यांची आई कृष्णा भारद्वाज या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या डीन होत्या. सुधा यांनी आपलं प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केले आहे.

अरुण परेरा :
मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून अरूण परेरा यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबई मानवाधिकार चळवळीतील ते महत्त्वाचे नेते मानले जातात. २००७ मध्ये परेरा यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी त्यांना ११ प्रकरणांमध्ये आरोपी केले होते. २०११हीमध्ये पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची जामिनावर सुटका झाली होती. २०१६ मध्ये अरूण परेरा यांनी सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पुर्ण केले. ते सध्या वकिल म्हणूनही काम करतात. ठाण्यातील राहत्या घरामधून त्यांना मंगळवारी अटक केली आहे.

वर्नन गोन्साल्विस :
वर्नन गोन्साल्विस हे सात वर्षे शिक्षा भोगून बाहेर आले आहेत. २००७मध्ये वर्नन यांना अवैद्य शात्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. २०१३मध्ये त्यांची सुटका झाली . त्यानंतर ते पुन्हा एकदा सक्रिय झाले. सध्या माओवाद्यांच्या अनेक चळवळीत वर्नन गोन्साल्विस सक्रिय आहेत. मुंबई मानवाधिकार चळवळीतमध्ये ते महत्त्वाचे नेते मानले जातात. २००७ मध्ये वर्नन गोन्साल्विस यांना अवैद्य शस्त्रसाठ्यासह अन्य १७ केसेसमध्ये अटक केली होती.

गौतम नवलखा :
गौतम नवलखा मानवाधिकार कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये गौतम नवलखा हे नाव प्रसिद्ध आहे. त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा संशय आहे. काश्मीरमधील फुटीरवाद्यांशीही त्यांचा संबंध असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गौतम नवलखा यांनी मानवाधिकारांच्या प्रश्नांवर काश्मीर आणि छत्तीसगढमध्ये काम केले आहे. गौतम नवलखा राजनैतिक आणि आर्थिक विषयावर साप्ताहिक स्तंभलेखनही करतात. गौतम नवलखा काश्मीरमधील आपल्या कामामुळे ओळखले जातात. काश्मीरमध्ये न्याय आणि मानवाधिकारासाठी आंतरराष्ट्रीय पीपल्स ट्रिब्यूनलचे आयोजनही त्यांनी केले होते. २०११मध्ये नवलखा यांना काश्मीरमध्ये जाण्यापासून श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले होते. त्यावेळी त्यांना राज्य सरकारने दिल्लीला परत धाडले होते.

वरवरा राव :

वरवरा राव हे ७८ वर्षांचे असून गेल्या चाळीस वर्षापासून ते तेलंगणा, आंध्र प्रदेशसह बस्तर भागात क्रांतीकारक कवी व लेखक म्हणून परिचित आहेत. मुळचे तेलंगणाच्या वारंगल जिल्हयात ३ नोव्हेबर १९४० साली जन्मलेले वरवरा राव यांनी १९५७ पासून विद्रोही कविता करायला सुरुवात केली. वरवरा राव हे देशातील माओवाद्यांचे आघाडीचे समर्थक मानले जातात. कवी, विचारवंत, लेखक म्हणून त्यांची ख्याती असल्याने त्यांच्या शब्दाला माओवाद्यांमध्ये मान आहे. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला त्यांचे समर्थन आहे. त्या अनुषंगाने हैदराबादमध्ये राव यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक केली गेली आहे. वरवरा राव यांनी तेलगू साहित्यामध्ये प्रमुख मार्क्सवादी समीक्षक म्हणून ओळखतात. विद्यार्थांना त्यांनी या विषयावर १० वर्षांपेक्षा जास्त काळ शिकवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कथित कट  रचल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला होता. १९७३ मध्ये आंध्र प्रदेश सरकारनेही वरवरा राव यांना अटक केली होती. एक महिन्यानंतर त्यांना हायकोर्टाने सबळ पुराव्या अभावी सोडले होते.