पिंपरी-चिंचवड शहरातील करोनामुक्त पाच जणांना आज घरी सोडण्यात आले. त्यांच्यावर गेल्या १४ दिवसांपासून भोसरीमधील नूतन रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांना दोन आठवडे होम क्वॉरंटाइन राहण्यास उपचार करणारे डॉ. लक्ष्मण गोफने यांनी सांगितले आहे. शहरात १२ करोना बाधित रुग्ण आहेत. पैकी, ८ जण हे करोनामुक्त झालेले असून ठणठणीत बरे झाले आहेत.

एकाच कुटुंबातील चार जणांना करोना विषाणूची बाधा झाली होती. यात दोन महिला, १२ वर्षाची मुलगी आणि मुलगा होता. तर दुसऱ्या एका तरुणावर देखील भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

पिंपरी-चिंचवड शहरात १२ जण करोना बाधित होते. परंतु, डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि केलेले उपचार यामुळे ८ जण करोनामुक्त झालेले असून बरे झाले आहेत. दुबईहून आलेला तरुणामुळे कुटुंबातील चार जणांना करोना विषाणूची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर भोसरी येथील नूतन रुग्णालयात उपचार सुरू केले. तर थायलंड येथून परतलेल्या तरुणालादेखील करोना विषाणूची बाधा झाली. १४ दिवसांच्या उपचारानंतर पाचही जणांची टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. करोनामुक्त झालेल्या पाच जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांनी टाळ्या वाजवून करोनामुक्त व्यक्तींचा उत्साह वाढवत डॉक्टरांचे कौतुक केले आहे.