अवजड वाहनावर (कंटेनर) मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरात पहाटे घडली. कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मोटार कंटेनरवर आदळली.

सिद्धेश्वर चंद्रकांत बर्डे (वय ५५), त्यांची पत्नी अनिता (वय ४०), मुलगी श्वेता (वय २३, तिघे रा. कोंढवा), शोभा शरणगौड पाटील (वय ३८), संतोष मल्लीनाथ पाटील (वय ३८,रा. भोसरी)अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी कंटेनरचालक अमोल विलास शिंदे (रा. वाळिखिंडी, जि. सांगली) याला अटक करण्यात आली. शरणगौड पाटील (वय ४५, सध्या रा. कोंढवा, मूळ रा. चितापूर, गुलबर्गा, कर्नाटक) यांनी यासंदर्भात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्डे आणि पाटील कामानिमित्त सोलापूर येथील नातेवाइकांकडे गेले होते. मध्यरात्री सर्व जण मोटारीतून सोलापूरहून पुण्याकडे निघाले. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटे सव्वा तीनच्या सुमारास यवत गावाजवळ अचानक कंटेनरचालकाने ब्रेक लावला. त्या वेळी मोटार चालक सिद्धेश्वर यांचे नियंत्रण सुटले आणि मोटार कंटेनरवर आदळली.

अपघातातील गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच पाच जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक  भाऊसाहेब पाटील म्हणाले, की  कंटेनरचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मोटारचालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार कंटेनरवर आदळल्याची माहिती मिळाली आहे.