टाळेबंदीच्या काळात मराठी पुस्तकांचा खरेदी-विक्री व्यवहार कोलमडला असला, तरी वाचकांनी उत्तम आणि दर्जेदार मजकूरासाठी ‘किशोर’ मासिकाच्या ऑनलाइन अंकांचा आधार घेतला आहे. अबालवृद्धांच्या आवडीच्या या मासिकाच्या संकेतस्थळाला गेल्या तीन महिन्यांत पाच लाखांपेक्षा जास्त भेटी देण्यात आल्या.

पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या मासिकाशी काही पिढय़ांचा स्नेह आहे. दोन वर्षांपूर्वी बालभारतीने किशोरचे १९७१ पासूनचे सर्व अंक संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिले. त्यामुळे जुने अंक वाचण्यासाठी वाचक किशोरच्या संकेतस्थळाला भेट देतात.  किशोरचे संपादक किरण केंद्रे म्हणाले, की टाळेबंदीच्या काळात मुलांच्या वाचनाची आणि वयस्कांच्या स्मरणरंजनाची भूक किशोरच्या संकेतस्थळाने भागवली.

वर्गणीदारांमध्येही वाढ

टाळेबंदीत छापील अंक प्रसिद्ध करणे शक्य नव्हते. मात्र, डिजिटल अंक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जात आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये वर्गणीदारांची संख्याही पाच हजारांनी वाढल्याची माहिती केंद्रे यांनी दिली.

झाले काय?

किशोरचे संकेतस्थळ तयार झाल्यापासून  दोन वर्षांत पाच लाख भेटी देण्यात आल्या होत्या. मात्र करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीपासून आतापर्यंतच्या कालावधीत देश-विदेशातून विक्रमी पाच लाखांहून अधिक भेटींची नोंद झाली.

विदेशातूनही प्रतिसाद

एकूण ७७ देशांतून संकेतस्थळाला भेटी मिळाल्याची नोंद झाली आहे. त्यात अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ओमान, नेदरलँड्स आदी देशांतून संकेतस्थळावरील वाचनासाठी भेटी देण्यात आल्या.