पुणे : बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पाच अल्पवयीन मुलींसह सोळा जणींची सुटका केली. अल्पवयीन मुलींना कुंटणखान्यात डांबून ठेवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.

कल्पना राजू शर्मा (वय ३८), अनु लक्ष्मीकांत शर्मा (वय ६५), झरीना सुनील तमांग (वय ४७), गंगामाया जीवन तमांग (वय ५०), सैली सोनम लामा (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या कुंटणखाना मालकिणींची नावे आहेत.

या प्रकरणी राजू नावाच्या दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलींना डांबून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकला. या कारवाईत कर्नाटक, पश्चिम बंगाल, दार्जिलिंग, झारखंड, पश्चिम बंगालमधील तरुणींची सुटका करण्यात आली.

कुंटणखान्यातून सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुली तसेच तरुणींची हडपसर भागातील निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे. सहायक आयुक्त बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक अश्विनी जगताप, वरिष्ठ निरीक्षक किशोर नावंदे, सहायक निरीक्षक शिंदे आदी या कारवाईत सहभागी झाले होते.