कानशिलात लगावल्याच्या कारणावरून चाकण एमआयडीसी मध्ये वर्कशॉप मालकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हरीशचंद्र किसन देटे (वय-४५) असे खून झालेल्या वर्कशॉप मालकाचे नाव आहे. तर जीवन दत्ता डोंगरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह ऐकून पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रमोद वशिष्ट कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हरीशचंद्र किसन देटे यांचे चाकण एमआयडीसीमध्ये व्ही.एच.डी नावाचे वर्कशॉप आहे. त्याठिकाणी आरोपी जीवन डोंगरेची पत्नी काम करते. सोमवारी सकाळी आरोपी पत्नीला वर्कशॉपमध्ये सोडवण्यासाठी आला होता. तेव्हा, काही कारणामुळे मयत हरिशचंद्र देटे आणि आरोपी जीवन डोंगरे यांच्यात भांडण झाले. हरिशचंद्र यांनी आरोपीच्या दोन कानशिलात लागवल्या. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. परंतु, कानशिलात लगावल्याचा राग मनात असल्याने जीवन डोंगरे हा स्वस्त बसला नाही. त्याने आपल्या पाच ते सहा साथीदारांसह हरीशचंद्र यांचे पुन्हा वर्कशॉप गाठत धिंगाना घातला.  वर्कशॉपचे मालक हरीशचंद्र हे बाहेर आले. त्यावेळी थेट लाथा बुक्क्यांनी मारहाण करत मुख्य आरोपी जीवन डोंगरे याने त्यांच्या डोक्यात दगड घातला. जखमी देठे यांना तत्काळ चाकणच्या एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढला.

या घटनेमुळे चाकण एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार करत आहेत. आरोपी हा भाड्याने रिक्षा घेऊन चालवत असे असंही पोलिसांनी सांगितले आहे.