काही संस्थांच्या पुनर्विकासात विविध कारणांमुळे अडचणी

पुणे शहर आणि जिल्ह्य़ात सुमारे १६ हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी अनेक संस्थांनी त्यांचे पुनर्विकास यशस्वीपणे केले आहे. काही संस्थांच्या पुनर्विकासात विविध कारणांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा सुमारे पाच हजार गृहनिर्माण संस्था पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी या गोष्टीवर प्रकाश टाकला. महासंघातर्फे महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने ‘जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासंबंधित समस्या व उपाय’ या विषयावर शुक्रवारी (३१ ऑगस्ट) मेहेंदळे गॅरेजजवळील मनोहर मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आणि सचिव मनीषा कोष्टी  यांनी मंगळवारी दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे विभागाचे सचिव आणि म्हाडाच्या पुणे विभागाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे या वेळी उपस्थित होते. राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, खासदार अनिल शिरोळे, मुंबई म्हाडाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर प्रभू, वास्तुशिल्पी विश्वास कुलकर्णी, राज्य सहकारी बँकेचे सदस्य अविनाश महागावकर, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्ष छाया आजगावकर, अ‍ॅड. व्ही. डी. कर्जतकर सहभागी होणार आहेत. गृहनिर्माण संस्थांशी संबंधित वकील, बँकर्स, क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, सहकार खात्यातील अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.