दोन वर्षांपूर्वी शंभर रुपये किलो असा उच्चांकी भाव मिळालेल्या टॉमेटोच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. उच्चांकी भावामुळे मोठय़ा प्रमाणावर टोमॅटोची लागवड करण्यात आली. त्याचा परिणाम होऊन घाऊक बाजारात टोमॅटोची आवक सातत्याने वाढत असून टोमॅटोचे दर कोसळले आहेत. घाऊक बाजारात तर दहा किलो टोमॅटोला ४० ते ६० रुपये किलो असा भाव मिळत आहे.

पुणे जिल्ह्य़ात टोमॅटोची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली जाते, तसेच सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी टोमॅटोला प्रतिकिलो ८० ते ९० रुपये असा भाव मिळाला होता. उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरीही सुखावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली. मागणीच्या तुलनेत बाजारात टोमॅटोची आवक वाढली आणि चांगला भावही मिळेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील प्रमुख अडते विलास भुजबळ म्हणाले,‘गेल्या महिनाभरापासून टोमॅटोची आवक वाढत आहे. पुणे विभागातील शेतकरी टोमॅटो विक्रीस पाठवित आहेत. मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्याने घाऊक बाजारात टोमॅटोचे दर कोसळले आहेत. घाऊक बाजारात दहा किलो टोमॅटोला ४० ते ६० रुपये असा भाव मिळाला आहे. मार्केटयार्डात दररोज आठ ते बारा हजार पेटी टोमॅटोची आवक होत आहे. एका पेटीत साधारणपणे वीस किलो टॉमेटो असतात.’

पुण्यात २० रुपयांत दोन किलो

टोमॅटोची आवक किरकोळ बाजारात मोठय़ा प्रमाणावर होत आहे. चांगल्या प्रतीच्या लालचुटूक टोमॅटोंची किरकोळ बाजारात दहा ते वीस रुपये किलो भावाने विक्री केली जात आहे. महात्मा फुले मंडई परिसरात तर काही विक्रेत्यांनी पंचवीस रुपयांत तीन किलो टोमॅटोची विक्री केली.

वाशी बाजारात ८ ते १२ रुपये किलो

वाशी येथील नवीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोची आवक वाढली आहे. साधारणपणे दररोज टोमॅटोच्या ३० ते ४० गाडय़ा दाखल होत आहेत. ठाणे, मुंबई परिसरात १० ते २० रुपये दराने टोमॅटोची विक्री केली जात आहे.

नाशिकमध्ये क्विंटलमागे ४०० रुपयांची घसरण

नाशिक येथील बाजार समितीच्या आवारात दररोज साधारणपणे ७०० ते ८०० क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. क्विंटलमागे टोमॅटोचे भाव चारशे रुपयांपर्यंत घसरले आहेत. नाशिकच्या बाजारातून गुजरात, मुंबई येथे मोठय़ा प्रमाणावर टोमॅटो विक्रीस पाठविला जातो. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने टोमॅटोच्या भावात घसरण झाली आहे, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.