डॉ. शैला दाभोलकर यांची भावना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाच्या तपासामध्ये आतापर्यंत माळेचे मणी सापडले आहेत. पण, तपासी यंत्रणेला लवकरच दोराही सापडेल, अशी भावना डॉ. शैला दाभोलकर यांनी रविवारी व्यक्त केली. ‘दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारांना कधी पकडणार?’ हा प्रश्न आपण पाच वर्षे झाली तरी विचारतच आहोत. तपासी यंत्रणा काम करीत असून तपासाला आता यश येत आहे. लवकरच कटाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचू अशी आशा वाटते, असेही शैला दाभोलकर यांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त समितीचे कार्यकर्ते अरुण जाधव यांनी संकलित केलेल्या विविध वृत्तपत्रांतील बातम्यांच्या कात्रण प्रदर्शनाचे उद्घाटन दाभोलकर यांच्या हस्ते झाले. डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, ठकसेन गोराणे, श्रीपाद ललवाणी, नंदिनी जाधव, विजया जाधव या वेळी उपस्थित होत्या. बालगंधर्व कलादालन येथे सोमवारी (२० ऑगस्ट) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

‘आपण काम खूप करतो. पण, त्याचे जतनीकरण करत नाही,’ असे डॉ. दाभोलकर नेहमी म्हणायचे. हे प्रदर्शन म्हणजे समितीने गेल्या पाच वर्षांत विवेकशील मार्गाने दिलेल्या लढय़ाचे जतनीकरण आहे, असे सांगून शैला दाभोलकर म्हणाल्या, या प्रदर्शनावर आधारित लघुपटाची निर्मिती करण्याची तसेच बातम्यांच्या पुस्तिका प्रकाशित करून समितीच्या विविध शाखांमध्ये प्रसारित करण्याची आवश्यकता आहे. दाभोलकर यांना पाहिलेले नाही, अशा नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना निर्भयता म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल.

जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते ही समितीची ताकद आहे. संघटनेला पुढे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच संघटना वर्धिष्णू होत राहील, असा विश्वास मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five years after narendra dabholkar murder shooter arrested
First published on: 20-08-2018 at 01:12 IST